पत्रकारांना नाकारला होता प्रवेश : महानगरपालिकेत वेगवेगळे नियम ऊजविले जात असल्याचे निदर्शनास
बेळगाव : महापालिकेतील सत्तांतर झाल्याने नवनवीन पायंडा घातला जात आहे. एरव्ही अर्थसंकल्पपूर्व तयारी बैठकीला सामाजिक संघटना व विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकारांच्या सूचनांची नोंद घेतली जात होती. मात्र यावेळी बैठकीला पत्रकारांना प्रवेश देण्यात आला नाही. पण महापालिकेच्या जावयांना प्रवेश देऊन त्यांच्यासाठी नगरसेवकांप्रमाणे आसन व्यवस्थादेखील करण्यात आली. त्यामुळे मनपाच्या जावयांना प्रवेश कसा दिला? असा मुद्दा उपस्थित होत आहे. महापालिकेत भाजपचे बहुमत असल्याने महापौर-उपमहापौरपदी भाजपच्या नगरसेविकांची निवड झाली आहे. सभागृहात मोजकेच नगरसेवक वगळता सर्व नगरसेवक नवोदित आहेत. सभागृहातील कामकाजाची माहितीही नाही. त्याचप्रमाणे महापालिकेतील प्रोटोकॉल व नियमावलींची माहिती नाही. अशातच बैठकांना पत्रकारांना टाळण्याचा प्रकार सुरू आहे. महापौर-उपमहापौर निवड झाल्यानंतर गुऊवारी प्रथमच अर्थसंकल्पपूर्व तयारीची बैठक आयोजित करण्यात आली होती. महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य, विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकडून अर्थसंकल्पाबाबत सूचना घेण्यात आल्या. बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना मात्र बैठकीला प्रवेश नाकारला. त्यामुळे पत्रकारांना माघारी परतावे लागले.
महापालिकेत नवीन नियमावली ऊजविण्याचा प्रकार नव्या सभागृहात सुरू आहे. वास्तविक पाहता पारदर्शी कारभार चालविण्याच्यादृष्टीने सर्व माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता वृत्तपत्र माध्यमांची आवश्यकता आहे. पण प्रत्येकवेळी वृत्तपत्र माध्यमांना लांब ठेवण्याचा प्रकार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चालविला आहे. यापूर्वी सभागृह अस्तित्वात असताना तसेच प्रशाकीय राजवटीतदेखील अर्थसंकल्प पूर्वतयारी बैठकीला पत्रकारांना परवानगी देऊन त्यांच्या सूचनांची नोंद घेतली जात असे. तत्कालीन मनपा प्रशासक तथा जिल्हाधिकारी एन. जयराम तसेच एम. जी. हिरेमठ यांच्या कालावधीत पत्रकारांच्या सूचनांची नोंद घेऊन अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली होती. शहरातील अन्य सुधारणांबाबतही पत्रकारांच्या सूचना बैठकीवेळी घेतल्या होत्या. मात्र यावेळी पत्रकारांना लांब ठेवण्याचा प्रकार महापौर-उपमहापौरांनी केला आहे. पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. मात्र उपमहापौरांच्या पतींना बैठकीला प्रवेश देऊन अधिकाऱ्यांच्या रांगेत मान-सन्मानाने बसविण्यात आले. मनपाच्या या जावयांना परवानगी दिली कशी? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. सामाजिक संस्था, संघटना, अन्य क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक असल्याचे सांगण्यात आले होते. मग उपमहापौरांच्या पतींना परवानगी कशी दिली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या बैठकीला कोणत्याही नगरसेवकांना आमंत्रित केले नव्हते. तरीही उपमहापौरांसह त्यांचे पतीदेखील उपस्थित होते. त्यामुळे वेगवेगळे नियम ऊजविले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.