दुरुस्तीकामासाठी खबरदारी, प्रवाशांची गैरसोय
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण-कारवार मार्गावरील पोर्तुगीजकालीन अर्धफोंड पुलाच्या दुरुस्ती कामाला प्रारंभ झाला असून या मार्गावरील अवजड मालवाहतूक व प्रवासी बसवाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पुलाच्या एका बाजूच्या भागात बेअरिंग्स बसविण्याचे काम सध्या चालू करण्यात आल्यामुळे मिनी बसेस तसेच कार व दुचाकीस्वारांना तेवढी पुलावरून जायला परवानगी देण्यात आली आहे.
सध्या या मार्गावरून वाहतूक करणाऱया प्रवासी बसेस बंद झाल्यामुळे पैंगीण, पर्तगाळी, खोतीगाव भागांतून चावडी तसेच अन्य भागांत येणाऱया प्रवाशांची बऱयाच प्रमाणात गैरसोय झालेली आहे. कारवार भागातून येणाऱया एसटी बसेस या मार्गाने यायच्या बंद झाल्या असून सर्व बसेस आता मनोहर पर्रीकर बगलमार्गावरून वाहतूक करायला लागल्या आहेत. खोतीगाव भागातून येणारी कदंब बस पैंगीण-माशे या मार्गावरून वाहतूक करीत आहे. त्यामुळे खोतीगावच्या प्रवाशांबरोबरच माशे ते पैंगीण, पर्तगाळी, श्रीस्थळपर्यंतच्या प्रवाशांची खूप गैरसोय झाली आहे.
हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने कंपनीने लक्ष दिले आहे. सध्या पुलाच्या एका बाजूच्या भागात बेअरिंग्स बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, पुलाच्या दुरुस्तीचे काम चालू असताना बऱयाचवेळा या मार्गावरून हलकी वाहने वाहतूक करीत असतात. त्यामुळे कामावर परिणाम होत असतो. अशावेळी या ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.