अलाया फर्निचरवालाने मागील वर्षी ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. अलायाला आता स्वतःच्या आगामी चित्रपटासाठी निर्माती एकता कपूरने करारबद्ध केले आहे. हा चित्रपट कन्नड सुपरहिट चित्रपट ‘यू-टर्न’चा हिंदी रिमेक असणार आहे. या चित्रपटाचा टीजर अलायाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अनेकदा जीवनात शॉर्टकट घेणेच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग नसतो, स्वतःच्या प्रवासाचा मार्ग बदलण्यापूर्वी दोनदा विचार करा आणि एक यू-टर्न घ्या असे अलायाने इन्स्टाग्रामवर टीजरसह नमूद केले आहे.
एकता कपूरच्या प्रॉडक्शन अंतर्गत तयार होणाऱया या चित्रपटाचे दिग्दर्शन आरिफ खान करणार आहे. मूळ कन्नड चित्रपटात समांथा अक्किनेनीने मुख्य भूमिका साकारली होती. हिंदी चित्रपटाचे चित्रिकरण 6 जुलैपासून सुरू होणार आहे.
अलायाचा पदार्पणातील चित्रपटातील अभिनय उत्तम होता. ती प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवेल असा विश्वास आहे. यू-टर्न एक अत्यंत रोमांचक चित्रपट असणार आहे असे उद्गार एकताने काढले आहेत.