चिपळुणातील प्रकार, वाहन जप्त
चिपळूण
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन लागू करण्यात आलेला असून यात केवळ अत्यावश्यक सेवेकरिता वाहनधारकांना पास देण्यात आलेले आहेत. असे असताना या संधीचा फायदा घेत 18 अवैध प्रवाशांची वाहतूक करणाऱया एकावर पोलिसांनी शुक्रवारी कडक कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर वाहने तपासणी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण, भालेकर, पडलेकर हे पोलीस कर्मचारी गस्त घालत आहेत. सती येथे अशोक लेलॅण्ड प्लस गार्ड या वाहनाची तपासणी केली असता या वाहनामध्ये 18 प्रवासी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या वाहनासह प्रवास करणाऱया प्रवाशांना चिपळूण पोलीस स्थानकात आणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, वाहनचालकांनी आपल्याला अत्यावश्यक सेवेसाठी दिलेल्या पासचा वापर त्याच कारणासाठी करावा. अत्यावश्यक सेवेस असलेल्या वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक अगर अन्य काही वाहतूक करताना सापडल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. तसेच कारवाईदरम्यान वाहनदेखील जप्त केले जात आहे. तरी अशी अवैध प्रवासी वाहतूक चालू असल्याचे निदर्शनास आल्यास चिपळूण पोलिसांशी (02355-25233) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.