आंध्रात अत्याधुनिक कारखाना स्थापनः वार्षिक 4 हजार 800 बसेसची निर्मिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बस व ट्रक उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर असणाऱया अशोक लेलँड कंपनीने आपल्या आंध्र प्रदेशमधील नव्या उत्पादन कारखान्यात वाहन निर्मिती सुरू केली असल्याचे समजते. अशोक लेलँडने या संदर्भातली माहिती शेअर बाजाराला दिली. आंध्र प्रदेशमधील विजयवाडापासून 40 किलोमीटर अंतरावर कृष्णा जिह्यामध्ये अशोक लेलँडने आपला बस निर्मिती कारखाना स्थापन केला आहे. या अंतर्गत व्यावसायिक स्तरावर बसेसचे उत्पादन सदरच्या कारखान्यामध्ये घेतले जाणार आहे.
दरम्यान जानेवारी 2021 मध्ये कंपनीची बस विक्री एकूण 69 टक्के घटून 830 वर आली आहे. मागच्या वषी समान महिन्यात 2 हजार 682 बसेसची विक्री करण्यात आली होती. एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत बस विक्री 82 टक्के घटून 3 हजार 662 वर घसरली आहे. मागच्या वषी समान कालावधीत 19 हजार 950 बसेसची विक्री करण्यात आली होती. बस विक्रीवर सध्या मोठय़ा प्रमाणावर दबाव दिसतो आहे. देशभरातील सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाल्याने मागणीमध्ये घट नोंदवली गेली आहे.
75 एकरच्या विस्तीर्ण जागेवर कंपनीचा कारखाना माल्लवळळी गावामध्ये स्थापन करण्यात आला असून आधुनिक तंत्रज्ञानाची मदत बस निर्मितीसाठी घेतली जात आहे. बस निर्मितीच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही. एकदा का हा कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू झाला की यातून वार्षिक 4 हजार 800 बसेसची निर्मिती केली जाणार असल्याचे अशोक लेलँडकडून सांगण्यात आले. या ठिकाणी इलेक्ट्रीक वाहन विकास केंद्रही स्थापन करण्यात येणार आहे. जेणेकरून भविष्यातील मागणीनुसार इलेक्ट्रीक वाहनांचे उत्पादन कंपनीला सुरू करता येईल.
या कारखान्याच्या माध्यमातून मध्य भारत, पूर्व भारत आणि दक्षिण भारतातील बाजारपेठेतील मागणी पूर्ण करता येणार आहे.