आगामी इंग्लंड दौरा व जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघ जाहीर, कोणताही आश्चर्यजनक बदल नाही
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पुन्हा तंदुरुस्त झालेले अष्टपैलू रविंद्र जडेजा व फलंदाज हनुमा विहारी यांचे आगामी इंग्लंड दौऱयाकरिता भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. भारतीय संघ या दौऱयात इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका व न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे.
निवडकर्त्यांनी या दौऱयासाठी अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान व अरझान नगवसवाल्ला या 4 राखीव खेळाडूंची देखील निवड केली आहे. बीसीसीआयने प्रेस रिलीजच्या माध्यमातून या निवडीची माहिती दिली.
केएल राहुल व वृद्धिमान साहा यांची तंदुरुस्ती सिद्ध करण्याच्या अटीवर संघात निवड केली गेली आहे. यापैकी केएल राहुलला अपेंडिक्स झाल्याने अलीकडेच शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली आहे तर साहाला कोरोनाची बाधा झाली आहे.
यापूर्वी भारताने या वर्षाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलिया दौरा केला त्यावेळी जडेजा व विहारी यांना दुखापतीचा सामना करावा लागला होता. सध्या जाहीर केल्या गेलेल्या संघातून फिरकीपटू कुलदीप यादव व जलद गोलंदाज नवदीप सैनी यांना डच्चू मिळाला आहे. हे दोघेही सध्या फॉर्ममध्ये परतण्यासाठी बरेच झगडत आहेत. निवडले गेलेले भारतीय संघातील खेळाडू या महिन्यातील तिसऱया आठवडय़ात इंग्लंडला रवाना होणे अपेक्षित आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील न्यूझीलंडविरुद्ध होणारी अंतिम लढत दि. 18 जूनपासून लॉर्ड्सवर खेळवली जाणे अपेक्षित आहे. त्यानंतर भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला दि. 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. उभय संघातील पहिली कसोटी नॉटिंगहममध्ये खेळवली जाईल. त्यानंतर लॉर्ड्स (12 ते 16 ऑगस्ट), लीड्स (25 ते 29 ऑगस्ट), द ओव्हल (2 ते 6 सप्टेंबर) व मँचेस्टर (दि. 10 ते 14 सप्टेंबर) येथे उर्वरित कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
भारतीय संघ
सलामीवीर ः रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अगरवाल
मधली फळी ः विराट कोहली (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, केएल राहुल.
अष्टपैलू ः रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर.
यष्टीरक्षक ः रिषभ पंत, वृद्धिमान साहा.
गोलंदाज ः जसप्रित बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव.
राखीव खेळाडू ः अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान, अरझान नगवसवल्ला.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची रुपरेषा
तारीख / लढत / ठिकाण
18 ते 22 जून / न्यूझीलंडविरुद्ध फायनल / साऊदम्प्टन
यजमान इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका
तारीख / लढत / ठिकाण
4 ते 8 ऑगस्ट / पहिली कसोटी / नॉटिंगहम
12 ते 16 ऑगस्ट / दुसरी कसोटी / लॉर्ड्स
25 ते 29 ऑगस्ट / तिसरी कसोटी / लीड्स
2 ते 6 सप्टेंबर / चौथी कसोटी / ओव्हल
10 ते 14 सप्टेंबर / पाचवी कसोटी / मँचेस्टर
जादा सलामीवीर म्हणून ईश्वरनला प्राधान्य
या प्रदीर्घ दौऱयात प्रारंभी 30 खेळाडूंचा जंबो संघ निवडला जाईल, अशी अटकळ होती. पण, प्रत्यक्षात 20 खेळाडूंचा संघ व 4 राखीव असे एकूण 24 खेळाडू निवडले गेले. अतिरिक्त सलामीवीर म्हणून अभिमन्यू ईश्वरन, प्रियंक पांचाळ व नवोदित देवदत्त पडिक्कल यांच्यात चुरस होती. त्यात अभिमन्यू ईश्वरनने बाजी मारली. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ईश्वरन व पांचाळ हे राखीव सलामीवीर म्हणून संघात समाविष्ट होते. 25 वर्षीय अभिमन्यू ईश्वरन राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधीत्व करत आला आहे.
युवा दिग्गज फलंदाज पृथ्वी शॉकडे पुन्हा दुर्लक्ष
यापूर्वी, आयपीएल स्पर्धेत उत्तम प्रदर्शन साकारणाऱया युवा फलंदाज पृथ्वी शॉचा या दौऱयासाठी विचार होईल, असे संकेत होते. पण, प्रत्यक्षात त्याचीही निवड झाली नाही. पृथ्वी शॉने ऑस्ट्रेलिया दौऱयात एकमेव कसोटी खेळली. पण, त्यातील खराब फॉर्ममुळे त्याची संघातून गच्छंती झाली आणि आताही त्याला आणखी प्रतीक्षा करावी लागेल, हे निश्चित झाले.
तिसऱया यष्टीरक्षकाचा विचार नाही
तिसरा यष्टीरक्षक म्हणून इशान किशन, कोना भरत यांच्यापैकी एकाला संधी मिळणार का, याची या संघनिवडीत उत्सुकता होती. मात्र, प्रत्यक्षात या दोघांचाही विचार झाला नाही. रिषभ पंत प्रथम पसंतीचा यष्टीरक्षक असेल व वृद्धिमान साहाला तंदुरुस्ती सिद्ध करण्याच्या अटीवर संघात स्थान दिले गेले असल्याचे बीसीसीआयने यावेळी स्पष्ट केले.
पंडय़ा गोलंदाजी करत नसल्याने शार्दुल ठाकुर गोलंदाजी अष्टपैलू
अलीकडील कालावधीत पाठीची शस्त्रक्रिया करवून घेतलेला हार्दिक पंडय़ा अद्याप पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करत नाही. त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर निवड समितीने शार्दुल ठाकुरला गोलंदाजी अष्टपैलू या नात्याने संघात स्थान दिले आहे.