बेळगावच्या टेटेपटूंची प्रगती पाहून समाधान : आंतरराष्ट्रीय पदक विजेते राज अरविंदन
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
पॅराऑलिंपिक स्पर्धेत भारताला 3 पदके मिळवून देणारे राज अरविंदन, चेन्नई व भारतीय अग्रमानांकित व पॅराऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झालेली बेबी सहना, इंडियाचे अव्वल खेळाडू संजीव हम्मण्णावर या आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटूंनी बेळगावच्या टेबलटेनिसपटूंची भेट घेऊन समाधान व्यक्त केले आहे.
टिळकवाडी येथील गोडसे टेटे हॉल येथे आंतरराष्ट्रीय पदक विजेते राज अरविंदन चेन्नई, बेबी सहना हे गोवा येथे आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी आले असतान बेळगावच्या टेबलटेनिसपटूंची धावती भेट घेतली. या दोन्ही दिग्गजांनी बेळगावच्या खेळाडूंचा सराव पाहिल्यानंतर प्रशिक्षकांना खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. नियमित सराव केल्यास बेळगावच्या खेळाडूंचा दर्जा निश्चितच उंचावू शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दै. तरुण भारत प्रतिनिधीशी बोलताना भारताचे प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय पदक विजेते राज अरविंदन म्हणाले, भारताचा टेबलटेनिसचा दर्जा आता सुधारत आहे. कोरीया, चीन यांच्यानंतर भारतही या खेळात आपला ठसा उमटवत आहे. बेळगावच्या टेटेपटूंसाठी आपण दर महिन्याला प्रशिक्षण देण्यासाठी येणार आहे. नियमित व कसून सराव केल्यास बेळगावचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना बेबी सहना म्हणाली, ‘आपण बेळगावच्या खेळाडूंसमवेत खेळलो असून त्यांच्याकडे चांगली क्षमता आहे. परंतु काही त्रुटी आहेत, त्या दूर केल्यास निश्चितच त्यांच्याकडून चांगला निकाल पहावयास मिळेल.’ बेळगावचे साहाय्यक एक्झिक्मयूटीव्ह इंजिनियर व आंतरराष्ट्रीय पदकविजेते संजीव हम्मण्णावर यांनीही बेळगावच्या खेळाडूंची कामगिरी पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी बेळगाव टेबल टेनिस संघटनेचे प्रशिक्षक संगम बैलूर, खेळाडू, पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.