विशाल मोरे/ रत्नागिरी
आंबा म्हणजे फळांचा राजा. पोटभर आंबे खाणाऱयांची संख्या आपल्याकडे कमी नाही. मात्र काहीजण आरोग्याच्या समस्येमुळे आंबा खाणे टाळतात. प्रकृतीच्या कारणास्तव आंबे खाणे टाळणाऱयासाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल इन्स्टिटय़ुट फॉर सबट्रोपिकल हॉर्टिकल्चर लखनौ येथे जैव सक्रिय संयुगांसह आंब्याचे नवे वाण विकसित करण्यात आले आहे. या आंब्यात कर्करोगविरोधी गुणधर्म असून याद्वारे अन्य उच्च औषधी फायदे होण्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे आंबा खा आणि कर्करोग पळवा, असे म्हणण्याची संधी उपलब्ध होण्याची शक्यता दृष्टीक्षेपात आली आहे. अरुणिका असे या आंब्याच्या नव्या प्रजातीचे नाव आहे.
कोकणात मोठय़ा प्रमाणात आंबा लागवड केली जाते. येथील वातावरण आंबा लागवडीसाठी पोषक आहे. मुळातच आंबा हे आरोग्याला पोषक अन्न मानले जाते. आता त्यातही विशेष औषधी गुणधर्म असतील तर त्याचे महत्त्वही आणखी वाढणार आहे. या नव्या प्रजातीची कोकणात लागवड शक्य असून यातून भविष्यात या आंब्याच्या विशेष जातीच्या लागवडीमुळे शेतकऱयांना चांगले उत्पन्न मिळेल आणि आरोग्याचे फायदेही मिळतील.
अरुणिका असे या नव्या प्रजातीचे नाव आहे. हा आंबा मॅगफिरेन व ल्यूपोल यासंह अनेक जैव सक्रिय संयुगांनी समृद्ध आहे. ल्युपोल आतडय़ात ग्लुकोज शोषण रोखून रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करतात. तर मॅगिफेरिन स्तन आणि कोलन कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करते. रक्तवाहिन्यासंदर्भातील रोगांपासून वाचण्यासही या आंब्यातील औषधी घटकांची मदत होणार आहे.
या आंब्याची आणखी एक विशेषता म्हणजे ही आंब्याची गोड प्रजाती असून यात ल्युपिओचे प्रमाण जास्त आहे. हे विविध आजारांच्या विरोधात लढण्यास सक्षम आहे. यामुळे जळजळ, संधिवात, सूक्ष्मजीव संक्रमण आणि कर्करोग यापासून बचाव होण्यासही मदत मिळणार आहे. या आंब्याची इतर संकरित आंबा जातीशी औषधी गुणधर्माच्या दृष्टीने तपासणी करण्यात येत आहे. हे संशोधन लवकरच मान्यता पावून त्याचा औषध म्हणून लवकरच वापर होईल, असा विश्वास लखनौच्या या संस्थेतील संशोधक करत आहेत. हे संशोधन प्रत्यात आल्यास कृषी क्षेत्रासह आरोग्य क्षेत्रातही मोठी क्रांती शक्य असल्याचे सांगितले जात आहे.