घाटरस्त्यावर अचानक भलेमोठे दगड
वार्ताहर / आंबोली:
आंबोली घाटात मुख्य धबधब्याकडे स्टॉल असलेल्या ठिकाणी दोन भले मोठे दगड अचानक रस्त्यावर आले. सध्या पर्यटकांना बंदी असल्याने दुर्घटना टळली. ही घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घाटातील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी घडली. यापूर्वीही दोनवेळा असा प्रकार घडला होता. एकदा प्रवाशांच्या कारमध्ये मागून दगड घुसला होता. त्यात महिला जखमी झाली होती. तर अन्य एक भला मोठा दगड रस्त्यावर आला होता.
आंबोलीत बुधवारी दुपारनंतर दमदार पावसाला प्रारंभ झाला. आतापर्यंत जवळपास 80 इंच पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी पाच ते सहा दिवस कडक ऊन पडल्याने या ठिकाणची जमीन वाळलेली होती. आता ती पूर्णतः ओली झाल्याने आणि तशातच जोराचा पाऊस असल्याने दरडीच्या ठिकाणचे भलेमोठे दोन दगड अचानक खाली रस्त्यावर आले. हे दगड कोसळताना कडकड आवाज आला. यावेळी सच्चिदानंद राऊळ आपले काम आटोपून सावंतवाडीत जात होते. त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी दगड खाली आले, त्यावेळी कोणीही पर्यटक अथवा गाडी नव्हती. तर पर्यटन बंद असल्याने येथील चहाचे स्टॉलही बंद आहेत. त्यामुळे जीवितहानी टळली. /