नाडण येथील तरुणाच्या महसूल, पोलिसांकडे विनवण्या : आईला पॅरालिसचा झटका
प्रशांत वाडेकर / देवगड:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. एखाद्या ठिकाणी जाणे गरजेचे असतानाही जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. अशीच काहीशी स्थिती देवगड तालुक्यातील नाडण येथील एका तरुणाची झाली आहे. वहिनीच्या दिवस कार्यासाठी गावी आला आणि लॉकडाऊनमध्ये गावातच अडकून पडला. तिकडे मुंबईमध्ये म्हाताऱया आईला पॅरॅलिसचा झटका आल्याने तिला हॉस्पिटलला ऍडमिट करायला घरात कोणीही नाही. डॉक्टरांचे पत्र असूनही त्याला मुंबईला जाण्यासाठी परवानगी मिळत नाही. हा तरुण पोलीस व महसूल विभागाकडे विनवणी करीत आहे.
देवगड तालुक्यातील नाडण गावातील नीलेश वारिक हा तरुण 20 मार्च रोजी वहिनीच्या दिवसकार्यासाठी पत्नीसह गावी आला. दिवसकार्य करून लगेच जायचे असल्याने आपल्या 75 वर्षीय वृद्ध आईला सोबत घेऊन आला नाही. त्याने शेजारील लोकांकडे आईची व्यवस्था करून तो गावी आला होता. मात्र, 22 तारखपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने नीलेश हा गावीच अडकून राहिला. आजारी आईला दुसऱयाच्या घरात ठेवून तो आला. त्यामुळे त्याला मुंबईत जाणे गरजेचे होते. पण, लॉकडाऊनमुळे त्याने शेजाऱयांना सांगून आईकडे लक्ष द्यायला सांगितले. मात्र 1 एप्रिल रोजी त्यांच्या आईला पॅरॅलिसचा झटका आला. आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यास सांगितले. मात्र, नीलेश हा गावी असल्याने तीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या भीतीने शेजारीदेखील हॉस्पिटलमध्ये जाण्यास घाबरत आहेत. अशा स्थितीत करायचे काय? नीलेशने पोलीस पाटलाला सांगितले. पोलीस पाटलाने पोलीस ठाण्यात पाठविले. पोलिसांनी सांगितले आम्हाला आदेश नाहीत. आम्ही तुम्हांला तसे पाठवू शकत नाही. मग नीलेश तहसीलदारांकडे गेला. तहसीलदारांनी देखील असमर्थता दर्शविली.
परवानगीसाठी प्रतिसाद नाही
कोरोनाचे मुंबईतील प्राबल्य दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईकर गावी येण्यासाठी विविध कल्पना राबवित आहेत. मात्र, मुंबईहून आलेला नीलेश हा मात्र आईच्या उपचारासाठी मुंबईत जाण्यासाठी प्रशासनाकडे हात जोडून विनंती करीत आहे. मात्र, त्याला मुंबईत जायची परवानगी मिळत नाहीय. नीलेश प्रत्येकाकडे हातपाय धरतोय. पण, त्याला प्रतिसाद मिळत नाहीय. जिल्हाधिकाऱयांनी नीलेशच्या परिस्थितीचे गांभिर्य ओळखून त्याला मुंबईला जायची परवानगी देणे आवश्यक आहे.