वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या नोव्हेंबर ते मार्च दरम्यान भारतात होणारी सातवी इंडियन सुपरलिग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा बंदिस्त स्टेडियममध्ये खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना महामारी परिस्थितीमुळे सदर निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतला आहे. सध्या गोवा आणि केरळमध्ये कोरोना प्रसाराचा वेग अधिकच वाढत असल्याने या राज्यात होणाऱया सदर स्पर्धेतील सामन्यावेळी हा नियम काटेकोरपणे अंमलात आणला जाईल.
इंडियन सुपरलिग फुटबॉल स्पर्धेचे वरिष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे गोवा आणि केरळ फुटबॉल संघाचे प्रतिनिधी यांच्यात सोमवारी बैठक झाली. कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या स्पर्धेतील सामने बंदिस्त स्टेडियममध्ये खेळविण्यास प्राधान्य देण्यात आले. या बैठकीला केरळ, गोवा, पश्चिम बंगाल आणि नॉर्थ इस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते. देशातील इतर राज्यात कोरोना परिस्थितीची तुलना केली तर केरळ आणि गोवा या दोन राज्यांची स्थिती थोडी फार बरी आहे.
ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्यावेळच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन कोरोना संदर्भातील प्रतिबंधक उपाय आणि नियमावलीची अंमलबजावणी करणे योग्य ठरेल, असा सूर या बैठकीमध्ये अनेक राज्यांच्या प्रतिनिधींनी काढला आहे.
14 मार्च रोजी मडगावच्या फातोर्डा स्टेडियमवर एटीके आणि चेन्नयीन एफसी यांच्यातील शेवटचा सामना कोरोना महामारी संकटामुळे बंदिस्त स्टेडियममध्ये खेळविला गेला होता याची आठवण या बैठकीत करून देण्यात आली. संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरू असून ब्रिटनमध्ये तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीनंतर क्रिकेट मालिकेला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. विंडीज आणि यजमान इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेवेळी इंग्लंडमध्येही कोरोना संदर्भातील नियमावलीचा अवलंब केला जाणार आहे.