मुश्रीफ यांचे पत्रकातून शिवसेना कार्यकर्त्यांना आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर व त्यांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान महाविकास आघाडीनेच केला आहे. गोकुळ संदर्भात त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून गैरसमज दूर केले जातील. असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे. सत्याजीत पाटील यांनी सत्ताधारी आघाडीची साथ सोडून राजर्षी शाहू आघाडीत सहभागी झाल्यानंतर पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. यापार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी पत्रक काढले आहे.
सव्वा वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलांमध्ये माजी आमदार सत्यजित पाटील यांचे सहकारी हंबीरराव पाटील-भेडसगावकर यांना जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम व आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी संधी दिली. महाविकास आघाडीने त्यांचा सन्मान केला आहे. शिवसैनिकांनी कृपया गैरसमज करून घेत कोणाच्यातरी चिथावणीला बळी पडू नये. असे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, शिवसैनिकांना माझा सवाल आहे की, गोकुळ दूध संघातील सत्तारूढ आघाडीला भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याप्रमाणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीरही केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप टीका करत आहे. त्यांच्या मांडीला मांडी लावून आपण कसे बसणार? असा सवाल पत्रकात म्हटले आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर भाजपचा अध्यक्ष करताना शाहूवाडी तालुक्यातील शिवसेनेने विनाअट पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. वास्तविक त्यावेळीच प्रश्न विचारला पाहिजे होता. आता आपण दूध उत्पादकांच्या हितासाठी आघाडी स्थापन केली आहे. या संदर्भातील सर्वांचेच गैरसमज दूर केले जातील, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.