प्रतिनिधी/ मडगाव
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण विश्वाचे भूषण होते, त्यांच्या जयंतीनिमित्त तरूणाईमध्ये जोश व स्फुर्ती निर्माण होत असते. आजच्या तरूणाईने त्यांचा आदर्श बाळगावा असे आम्ही आवाहन करतो. तरूणाईने शिवाजी महाराजांचा एक तरी गुण आत्मसात केला तरी आयुष्याची पुण्याई होईल असे उद्गार फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक यांनी काढले.
शिवजयंती निमित्त काल मडगावात मिरवणुकीचे आयोजन शिवसाम्राज्य या संस्थेने केले होते. या मिरवणुकीच्या शुभारंभ प्रसंगी दामू नाईक बोलत होते. यावेळी कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, नगरसेवक सदानंद नाईक व बबिता नाईक तसेच शिवसाम्राज्य संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिव छत्रपतीची केवळ मिरवणूक काढून नव्हे तर त्यांचे संपूर्ण चरित्र वाचून त्यांनी जो येवढा मोठा पराक्रम केला, या पराक्रमामागे सुद्धा त्यांची निती होती, आया-बहिणीकडे बघण्याची निती असेल, युद्धाचा अभ्यास करताना आपले राष्ट्र कसे सांभाळावे, आपण बांधलेला जो संपूर्ण तट आहे. तो तट सांभाळताना दुष्मनाचा कसा मुकाबला करावा, त्यांनी ज्या पद्धतीने राज्य केले हा संशोधनाचा (पीएचडी)चा विषय आहे. आजही त्यावर संशोधन होत आहे असे दामू नाईक म्हणाले.
शिवाजी महाराज तल्लक बुद्धिचे होते
छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुण्यात जे पाण्याचे नाले बांधले होते. त्यावेळी त्या नाल्याची पातळी कशी घेतली जात होती, पाणी जनतेपर्यंत सुरळीत कसे जाईल, पाटबंधारे योजना त्यावेळी कशी मार्गी लावली हा खूपच गहन विषय आहे. शिवाजी महाराज यांनी अवघीच वर्षे राज्य केले. ते सर्वांना प्रेरणादायी होते. इंग्रज भारतात येणार याची चाहू लागताच, महाराजांनी इग्रजी भाषा शिकून त्या भाषेवर प्रभुत्व मिळविले, इंग्रजांकडे इंग्रजीमधून महाराजांनी वार्तालाप करताना आपले सामर्थ दाखवून दिले. महाराज तल्लक बुद्धिचे होते. याचे विवेचन खऱया अर्थाने व्हायला पाहिजे असे ते पुढे बोलताना म्हणाले.
आजही सर्वांच्या हृदयात मानाचे स्थान
शिव जयंतीच्या कार्यक्रमाला दरवर्षी आपण आवर्जुन उपस्थित राहतो. शिवाजी महाराज हे सर्वधर्म समभाव पाळणारे नेते होते. म्हणून आजही ते सर्वाच्या हृदयात मानाचे स्थान करून राहिले आहे. दर वर्षी मडगावात भव्य मिवरणूक निघते. या मिरवणुकीला तसेच समस्त गोवेकरांना शिवजयंतीच्या आपण शुभेच्छा देतो असे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यावेळी म्हणाले.
या मिरवणुकीला घोगळ-मडगाव येथून प्रारंभ झाला, नतंर ही मिवरणूक रूमडामळ हाऊसिंग बोर्ड मार्गे मारूती मंदिरा पर्यंत आली. तेथून ते पावर हाऊस आकें, सिने विशांत रोड मार्गे मडगाव शहरात आली व लोहिया मैदानाजवळ तिचे विसर्जन झाले. या मिवरणुकीत स्थानिक ढोल-ताशा पथकाचा समावेश होता.