रात्री 11 पासून पहाटे 5 पर्यंत लागू : 2 जानेवारीपर्यंत जारी : ख्रिसमस साजरा करण्यास अनुमती
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाच्या नव्या स्वरुपाच्या विषाणूचा धोका असल्याने कर्नाटकातही गुरुवार दि. 24 पासून 2 जानेवारी 2021 पर्यंत नाईट कर्फ्यू (रात्रीची संचारबंदी) जारी करण्यात आला आहे. रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू लागू राहणार असून या कालावधीत नागरिकांना घराबाहेर न पडण्याची सूचना करण्यात आली आहे. या कालावधीत बस, टॅक्सी, रेल्वे, विमानांच्या संचारावर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. दरम्यान, कोविड मार्गसूचीचे पालन करून ख्रिसमसनिमित्त होणारे धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
ब्रिटनमध्ये नव्या स्वरुपाचा कोरोना आढळून आल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार राज्यात खबरदारी बाळगण्यात येत आहे. महाराष्ट्रातही नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला असून बुधवारी राज्यातही रात्रीची संचारबंदी जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी रात्रीपासून कर्फ्यू जारी केला जाणार आहे. राज्य सरकारचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर यांनी यासंबंधीची अधिकृत मार्गसूची जारी केली आहे. त्यानुसार 24 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत दररोज रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत नाईट कर्फ्यू लागू राहणार आहे. या कालावधीत तातडीच्या सेवा वगळता मद्य दुकानांसह सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनीदेखील याबाबतचे ट्विट केले आहे.
कोरोनाच्या नव्या विषाणूचा फैलाव होऊ नये, या उद्देशाने राज्य सरकारने बुधवारी सकाळी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्यमंत्री आणि कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत नाईट कर्फ्यू जारी करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी रात्री 10 पासून सकाळी 6 पर्यंत तो लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यामुळे बाजारपेठ व कामगारांची गैरसोय होणार असल्याने कर्फ्यूच्या वेळेत बदल करण्यात आली. त्यामुळे कर्फ्यूच्या वेळेत रात्री आणि सकाळी प्रत्येकी एक तास कपात करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.
कर्फ्यूची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्याला निर्देश देण्यात आले आहेत. सभा-समारंभ, धार्मिक कार्यक्रम, नागरिकांची वर्दळ, बाजारपेठ व इतर व्यावसायिक आस्थापने बंद राहणार आहेत. परंतु, कामगारांच्या व उद्योगांच्या हितासाठी रात्रपाळीत काम करणाऱयांना सूट देण्यात आली आहे. तसेच इस्पितळ, मेडिकल, प्रवासी व मालवाहतूक करण्यास परवानगी दिली आहे.
नाईट कर्फ्यूची मार्गसूची
- रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत घराबाहेर वावरण्यावर निर्बंध
- रात्रपाळीत कंपन्यांमध्ये 50 टक्के कर्मचाऱयांसह काम करण्यास अनुमती
- कर्मचाऱयांनी ओळखपत्र दाखविणे आवश्यक
- कारखाने 24 तास सुरू ठेवण्यास निर्बंध नाहीत
- 24 डिसेंबर रोजी रात्री ख्रिसमस साजरा करण्यास परवानगी
- चित्रपटगृहांमधील रात्रीचा शो बंद राहणार
- हॉटेल, पब, बार, रेस्टॉरंट बंद राहतील
रात्री 11 नंतर मद्य दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना
कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका असल्याने राज्यात नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून कर्फ्यूच्या कालावधीत मद्य दुकाने सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधित दुकान मालकाचा मद्यविक्रीचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा अबकारी मंत्री एच. नागेश यांनी दिला. नाईट कर्फ्यूमध्ये अबकारी खात्याची भूमिका महत्त्वाची आहे. या कालावधीत मद्यविक्रीसाठी नियम शिथिल केल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढेल. त्यामुळे रात्री 11 नंतर मद्य दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले.