आरोग्याची खबरदारी घेण्याच्या शिक्षण विभागाकडून सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवार दि. 6 रोजी 6 वी ते 8 वी पर्यंतचे ऑफलाईन वर्ग भरविले जाणार आहेत. शाळा सुरू होणार असल्याने वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तब्बल दीड वर्षानंतर विद्यार्थी शाळेमध्ये जाणार असल्याने त्यांनाही शाळेला जाण्याची उत्सुकता लागली आहे.
राज्यात 9 वी व 10 वी चे वर्ग सुरू केल्यानंतर आता टप्प्या टप्प्याने इतर वर्ग सुरू केले जात आहेत. सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग सोमवार पासून सुरू होणार असल्याने शाळांमध्ये तशी तयारीही करण्यात आली आहे. काही शाळांमध्ये नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यामुळे सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग दुपारनंतर भरविले जाणार आहे. ज्या शाळांमध्ये हायस्कूल नाही त्या शाळांमध्ये सकाळी 10 ते दुपारी 12.30 या काळात वर्ग भरविले जाणार आहेत.
आठवडय़ाला दोन दिवस असणार सुटी
यापुढे शाळांना आठवडय़ातील दोन दिवस साप्ताहिक सुटी असणार आहे. रविवार सोबतच शनिवारीही शाळांना सुटी असणार आहे. परंतु शनिवारी शिक्षकांना मात्र शाळेवर हजर रहावे लागणार आहे. वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण करणे, आठवडाभराचे नियोजन करणे अशा विविध जबाबदाऱया शिक्षकांवर सोपविल्या जाणार आहेत.