व्हॅक्सिन डेपो येथे एकवटणार मराठी भाषिक : परिसरात पोलीस बंदोबस्त
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवार दि. 13 पासून बेळगाव येथील सुवर्णसौध येथे प्रारंभ होत आहे. मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी अधिवेशन भरविले जात असून याला आपला विरोध दर्शविण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली 13 रोजी सकाळी 11 वा. व्हॅक्सिनडेपो येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्याला सीमाभागातील मराठी भाषिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन म. ए. समितीतर्फे करण्यात आले आहे.
बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी हलगा गावानजीक सुवर्ण विधानसौध बांधण्यात आले. यामध्ये एक अधिवेशन भरविले जाते. मराठी भाषिकांनी सुरूवातीपासूनच या सुवर्ण विधानसौधला विरोध दर्शविला आहे. ज्या ज्या वेळी अधिवेशन भरविले जाते. त्या त्या वेळी मराठी भाषिकांनी विरोध दर्शवून महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या महामेळाव्याला आजवर महाराष्ट्रातील नेतेमंडळींनी उपस्थिती दर्शवून सीमावासियांचा आवाज बुलंद केला आहे.
यावषीचे हिवाळी अधिवेशन 13 पासून बेळगावमध्ये भरविले जाणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील व्हॅक्सिनडेपो येथे सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत महामेळावा घेतला जाणार आहे. महामेळाव्यासाठी बेळगाव शहरासह तालुका, खानापूर, निपाणी परिसरात जागृती बैठका घेण्यात आल्या. अधिकाधिक मराठी भाषिकांनी या महामेळाव्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन या बैठकांवेळी करण्यात आले आहे.
व्हॅक्सिनडेपोला पोलीस छावणीचे स्वरूप
प्रशासनाने दडपशाहीचे प्रकार पुन्हा सुरू केले आहेत. महामेळाव्याच्या पूर्व संध्येला व्हॅक्सिन डेपो परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. व्हॅक्सिनडेपोकडे जाणाऱया मार्गांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. दडपशाही करून मराठी भाषिक व्हॅक्सिनडेपोकडे पोहोचणार नाहीत यासाठी प्रशासनाचा खटाटोप सुरू आहे. परंतु ही बंधने झुगारून मोठय़ा संख्येने महामेळाव्याला उपस्थित राहण्याचा निर्धार मराठी भाषिकांनी केला आहे.
महाराष्ट्रातील नेते मंडळींना निमंत्रण
65 वर्षे उलटली तरी सीमाभागातील मराठी भाषिकांची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा कायम आहे. त्यामुळेच ज्या ज्या वेळी सीमाभागावर अन्याय झाला आहे. त्या त्या वेळी महाराष्ट्रातील नेतेमंडळींनी आवाज उठविला आहे. यावषीच्या महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातील नेतेमंडळींना निमंत्रणपत्र पाठविण्यात आले आहे. सीमासमन्वय मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळींना मध्यवर्ती म. ए. समितीने निमंत्रणपत्र पाठविले आहे.