जामिनासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात जावे लागणार
सपचे दिग्गज नेते आणि रामपूरचे आमदार आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आझम खान यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने तेथेच याची सुनावणी व्हावी असे सर्वोच्च न्यायालयाकडून म्हटले गेले.
आझम खान याच्या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी करावी असे उच्च न्यायालयाला सांगण्यात आले. उत्तरप्रदेशच्या सीतापूर तुरुंगात कैद आझम खान यांनी विधानसभा निवडणुकीत भाग घेण्यासाठी जामीन मंजूर करण्याची मागणी केली होती. उत्तरप्रदेश सरकार जाणूनबुजून आपला खटला प्रलंबित ठेवत असल्याचा आरोप आझम खान यांनी याचिकेत म्हटले हेते.
आझम खान यांच्याविरोधात 47 गुन्हे नोंद आहेत. आम्हाला संधी दिली जात नाही. आझम यांच्या विरोधात राजकारण होतेय असा युक्तिवाद त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे. यावर राजकारणाबद्दल येथे बोलू नका असे न्यायालयाने त्यांना सुनावले.
दोन महिन्यांपासून उच्च न्यायालयात याप्रकरणी निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. आझम खान यांना निवडणुकीच्या प्रचारात सामील होण्याची इच्छा असल्याने त्यांना जामीन मिळणे आवश्यक असल्याचे सिब्बल यांनी सुनावणीवेळी म्हटले. आझम खान यांच्या मुलाला काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे. अब्दुल्ला आझम हे स्वार मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.