आटपाडी / प्रतिनिधी
आटपाडीतील रद्द झालेल्या प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजाराला मोठा प्रतिसाद लाभला. तब्बल दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा उत्सुकतेचा विषय ठरला. या बकऱ्याला 70 लाखाची मागणी आली.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आटपाडी कार्तिक पौर्णिमेची यात्रा प्रसिद्ध आहे. येथे पशुपालक, मेंढपाळ मोठ्या संख्येने येत असतात. चालूवर्षी कोरोनामुळे यात्रा रद्द झाली. त्याऐवजी फक्त जनावरांचा बाजार रविवारी आणि सोमवारी भरविण्यात येत आहे. रविवारी मोठ्या उत्साहात हौशी मेंढपाळ पशुपालक यांनी आपल्या जनावरांसह हजेरी लावली. सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील बाबुराव मेटकरी यांचा मोदी नावाचा प्रसिद्ध बकराही बाजारात दाखल झाला. त्याचा दर दीड कोटी इतका आहे. तर त्याला सत्तर लाखाची मागणी करण्यात आली.
आटपाडीतील सोमनाथ जाधव यांच्या मेंढीला 13 लाख रुपये इतकी मागणी झाली. ही मेंढी प्रसिद्ध मोदी बकऱ्याचे पिल्लू आहे. त्यांनी ती दोन लाखाला खरेदी केली होती. सोमनाथ जाधव यांच्या अन्य तीन मेंढ्या तब्बल नऊ लाख रुपयांना शेतकऱ्यांनी मागितले. तर मासाळवाडी येथील शिवाजी तळे यांच्या सात महिन्याच्या मेंढीला चार लाख रुपयांची मागणी आली. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, संचालक विष्णू अर्जुन, पंढरीनाथ नागणे आदींनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.