कोरोना महामारी फैलावासह जगभरातील कामकाजाची पद्धत बदलली आहे. मोठय़ा संख्येत कंपन्यांना कर्मचाऱयांना घरातून काम करण्याची सूट दिली आहे. आता यात एक बदल होऊ शकतो. अनेक मोठय़ा कंपन्या आता आठवडय़ात 4 दिवसाचा पर्याय देत आहेत. आइसलँडमध्ये अशाप्रकारचे परीक्षण झाले असून यात कामाच्या दिवसांमध्ये कपात करण्यात आली. या परीक्षणात आठवडय़ातील 4 दिवस काम करणारी कर्मचारी अधिक प्रॉडक्टिक्ह असल्याचे आढळून आले आहे.
आइसलँडमध्ये वर्क-लाइफ संतुलनाची चर्चा पूर्वीपासूनच सुरू होती. कामाच्या दीर्घ तासांमुळे कर्मचारी कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नसल्याने ते तणावाला बळी पडतात. याचा परिणाम कामावरही दिसून येतो. हेच पाहून आइसलँडमध्ये हे परीक्षण पार पडले आहे.
2015 ते 2019 मध्ये चाललेल्या या परीक्षणात 100 कंपन्यांच्या 2500 हून अधिक जणांनी भाग घेतला. हा आकडा देशाच्या कार्यरत लोकसंख्येच्या सुमारे 1 टक्के इतका आहे. आठवडय़ात चार दिवसच काम करा असे या लोकांना सांगण्यात आले. यामुळे आठवडाभरातील कामाचे तास कमी होत 35 तासांवर आले.
आइसलँडिक असोसिएशन ऑफ सस्टेनबिलिटी अँड डेमोक्रेसीसोबत युकेतील थिंकटँक ऑटोनॉमीने मिळून अध्ययनाचे विश्लेषण केले. कामाचे दिवस कमी झाल्याने कर्मचारी अधिक आनंदी राहू लागले. याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या कामावरही झाला. कंपनीला अत्यंत चांगले निष्कर्ष प्राप्त होऊ लागल्याचे अध्ययनात आढळून आले.
परीक्षणाचे निष्कर्ष समोर आल्यावर देशातील सुमारे 86 टक्के कंपन्यांनी आठवडय़ात 4 दिवस कामाचा नियम लागू केला आहे. आइसलँडसह जपान, स्पेन आणि न्यूझीलंडमध्येही असेच परीक्षण सुरू आहे.