सीसीबी अधिकाऱयांची संजनाच्या निवासस्थानावर धाड : पाच दिवसांची पोलीस कोठडी
प्रतिनिधी/ बेंगळूर
कन्नड चित्रपटसृष्टीतील ड्रग्ज प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळेच वळण मिळत आहे. मंगळवारी बेंगळूरच्या सीसीबी पोलिसांनी अभिनेत्री संजना गल्रानी हिला अटक केली आहे. या प्रकरणात अटक झालेली ही दुसरी अभिनेत्री आहे. यापूर्वी अभिनेत्री रागिणी द्विवेदी हिला अटक करण्यात आली होती. संजनाला न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
बेंगळूरमध्ये ड्रग्ज प्रकरणी तीन जणांच्या टोळीला अटक केल्यानंतर कन्नड चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचा ड्रग्ज माफियांशी कनेक्शन असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी सकाळी सीसीबी पोलिसांच्या पथकाने बेंगळूरच्या इंदिरानगर येथील संजनाच्या ‘साईतेज’ अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा टाकला. तिच्या घरात झडती घेऊन मोबाईल, कागदपत्रे व इतर साहित्य जप्त केले. नंतर 10 च्या सुमारास तिला चामराजपेठ येथील सीसीबीच्या मुख्यालयात नेऊन चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर सायंकाळी तिला न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
संजनाचा प्रियकर राहुल तोन्से आणि आणखी एक अटकेतील आरोपी पृथ्वी शेट्टी यांच्यावरील कारवाईदरम्यान मिळालेल्या माहितीवरून संजनाला अटक करण्यात आली आहे. छाप्यादरम्याने तिने हंगामा केला. आपल्याला कोणतीही नोटीस न बजावता धाड कशी टाकली, असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा सीसीबी अधिकाऱयांनी तुम्ही आमच्या ताब्यात आहात. त्यामुळे आम्ही तुमच्या सांगण्याप्रमाणे वागू शकत नाही. न्यायालयाच्या सर्च वॉरंटला विरोध केल्यास तुम्हाला आखणी अडचणींना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.
इव्हेंट मॅनेजमेंट करणारा पृथ्वी शेट्टी याच्याकडून अमली पदार्थ पुरविण्यात येत असल्याच्या आरोपाखाली त्याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. तो चालवत असलेल्या कंपनीमध्ये संजनाचीही भागिदारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांकडून छापासत्र सुरू आहे. या प्रकरणात आणखी एका अभिनेत्रीचे नाव चर्चेत असून तिच्यावरही कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता आहे.
बॉक्स….
आणखी एका आरोपीच्या निवासस्थानात पोलिसांचा गणवेष?
मंगळवारी सकाळी 6.30 च्या सुमारास अभिनेत्री संजनाबरोबरच पाटर्य़ांचे आयोजन करणारा मुळचा दिल्लीतील विरेन खन्ना याच्या बेंगळूरमधील शांतीनगर व दिल्लीतील निवासस्थानावर सीसीबी पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकले. या प्रकरणात त्याला मागील आठवडय़ात दिल्लीत अटक करण्यात आली होती. चौकशीवेळी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मंगळवारी त्याच्या निवासस्थानांवर धाडी टाकण्यात आल्या. त्याच्या निवासस्थानी कर्नाटक पोलिसांसाठी असणारा गणवेषही आढळून आला आहे. तो गणवेष पोलिसांचाच आहे की पोलीस म्हणून भासविण्यासाठी तयार करून घेतला आहे?, याचा तपास केला जात आहे.