खेड, रत्नागिरी :
मुंबईतून गावी येणाऱया चाकरमान्यांचा ओघ वाढत असतानाच कोरोनाबाधितांची संख्यादेखील वाढत आहे. बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार खेडमधील 5, दापोली व चिपळुणातील दोघांसह आणखी 7 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील बाधीतांची संख्या 113 वर पोहचली आहे. खेडमधील दहिवली गावात यापुर्वी बाधीत आढळलेलया बाप-लेकाच्या कुटुंबातील आणखी तिघांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हा प्रशासनाकडे बुधवारी रात्री उशीरा प्राप्त झालेल्या 9 अहवालांपैकी 7 अहवाल पॉझीटीव्ह आले आहे. यामध्ये खेड तालुक्यातील दहिवली येथील 3, कोरेगाव व वरवलीतील प्रत्येकी एक, चिपळुणमध्ये कोसबी येथील एक, तर दापोलीतील नानटे येथील एकाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे बुधवारीच जिल्हय़ात कोरोनाबाधीतांच्या संख्येने शंभरी पार करत 106 वर झेप घेतली होती. त्यात रात्री आणखी 7 जणांची भर पडून ही संख्या आता 113 वर पोहचली आहे.
5 रूग्णांमुळे खेड प्रशासनाची धावपळ
खेड तालुक्यातील दहिवली येथील बाप-लेकांच्या कुटुंबातील तिघांसह कोरेगाव, वरवलीतील युवकांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. एकाचवेळी तालुक्यात 5 नवे रूग्ण सापडल्याने प्रशासकीय यंत्रणांची धावाधाव सुरू झाली आहे. नव्या रूग्णांमुळे खेड तालुक्यातील बाधीतांची संख्या 12 झाली आहे. यामध्ये दोघांना आतापर्यत डिस्चार्ज मिळाला असून एकाचा मृत्यू झाला आहे.
6 दिवसांपूर्वीच डोंबिवलीमधून दहिवली-गावठण येथे आलेल्या बाप-लेकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबातील चौघांना लवेल येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच कुटुंबातील 5 जण पॉझीटीव्ह आल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. या तिघांना बुधवारी मध्यरात्री कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू झाला आहे. यापुर्वीच दहिवली परिसर कन्टेन्मेंट झोन जाहीर करून 1 कि. मी. परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. गावातील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.
दिवा-मुंबई येथून 4 मे रोजी आलेल्या कोरेगाव-बेलवाडीतील 20 वर्षीय युवकाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. या युवकालाही रात्री कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. हा युवक अन्य 28 जणांसोबत एका शाळेत राहत होता. त्यामुळे शाळेतील युवकांनाही क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरू होत्या.
त्याचबरोबर ठाणे येथून आलेल्या वरवली-धुपेवाडीतील 18 वर्षीय युवकही कोरोनाबाधित आढळला आहे. हा युवक 10 मे रोजी मुंबईतून ओमळी मार्गे गावी आला होता. गावी आल्यानंतर त्याला ग्रामस्थांनी प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याच्या संपर्कातील 10 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. वरवली-धुपेवाडी व सुतारवाडी 150च्या आसपास लोकवस्ती आहे. या दोन्ही वाडय़ा सील करण्यात येणार आहे. गावात 150हून अधिकजण चाकरमानी मुंबईहून आले आहेत. त्यांचीही माहिती घेण्यात येत आहे.