30 सप्टेंबरपर्यंत सर्व बँकांमध्ये चेक ट्रंकेशन सिस्टम अवलंबली जाणार : रिझर्व्ह बँकेचे निर्देश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सध्या तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र बदल होत असल्याचे पहावयास मिळत आहे. सर्वांकडून सर्वाधिक वापर होणारे क्षेत्र म्हणून बँकिंग क्षेत्रास ओळखले जाते. यामध्ये काळानुरुप वेगाने बदल होत गेले आहेत. याचा भाग म्हणून आता धनादेश (चेक) वटविण्यासाठी सर्व बँकांमध्ये चेक ट्रंकेशन सिस्टम (सीटीएस) लागू करण्यात येणार असल्याची माहिती असून या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांच्याकडून निर्देश देण्यात आले आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर आता लवकरच चेक 24 तासात वटणे शक्य होणार असल्याचे समजते.
सदरची नवीन सीटीएस सुविधा ही 30 सप्टेंबरपर्यंत लागू करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. यामध्ये सीटीएस प्रणालीच्या मदतीने धनादेश वटविण्याच्या कामात गती निर्माण होणार असून ग्राहकांना अधिकच्या प्रतीक्षेविना वेळेत सुविधा प्राप्त होणार असल्याची माहिती आहे.
बँकेत धनादेश वटविण्यासाठी लागणारा अधिकचा कालावधी, धनादेश संकलनाचा लागणारा वेळ यासह अन्य गोष्टी लक्षात घेत सर्व शाखांमध्ये इमेजवर आधारित सीटीएस 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
काय आहे सीटीएस यंत्रणा ?
सीटीएस ही धनादेश वटविणारी एक प्रक्रिया आहे. यामध्ये प्रत्यक्ष सादर केलेल्या धनादेशाला एका जागेवरुन दुसऱया जागी पाठवावा लागत नाही. तर धनादेशाचा फोटो घेत तो वटविण्यात येतो.
2010 मध्ये आली होती सीटीएस सिस्टम
चेक टंकेशन सिस्टम वर्ष 2010 मध्येच सुरु झाली होती, परंतु आतापर्यंत फक्त 1.50 लाख शाखांमध्ये ही सिस्टम लागू करण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेत आरबीआयने सर्व बँकेच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना परिपत्रक सादर केले आहे. सिस्टम लवकरात लवकर लागू झाल्यास चेक वटून अनेकांची सोय होणार आहे.