जगात सध्या कॉफी या पेयाची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. नैसर्गिक कॉफी बियांचे उत्पादन ही मागणी पूर्ण करण्यासाठी कदाचित भविष्यकाळात अपुरे पडेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे वैज्ञानिकांनी कृत्रिम (आर्टिफिशियल) कॉफी तयार करण्याचे प्रयत्न काही वर्षांपासून सुरु केले होते. या प्रयत्नांवर आता यश प्राप्त झाले आहे. ही कृत्रिम कॉफी स्वाद, चव आणि सुगंध इत्यादी संदर्भात नैसर्गिक कॉफीसारखीच आहे असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
फिनलँड देशाच्या व्हीव्हीटी तांत्रिक संशोधन केंद्रात ही कॉफी विकसित करण्यात आली आहे. फिनलँड हा देश कॉफी प्रेमींचा म्हणून ओळखला जातो. युरोपमध्ये सर्वात जास्त कॉफी या देशात प्यायली जाते. मात्र, नैसर्गिक कॉफीचे उत्पादन येथे होत नाही. कॉफी बिया किंवा कॉफीची भुकटी आयात करावी लागते. ही आयात थांबविण्यासाठी तांत्रिक पद्धतीने कृत्रिम कॉफीचा प्रयोग करण्यात आला.
प्रयोग शाळेत कृत्रिम कॉफी तयार करण्यासाठी कॉफीचे जगप्रसिद्ध रोप अरेबिकाचा उपयोग करण्यात आला. सेल्युलर ऍग्रीकल्चर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अरेबिका रोपाच्या पेशींचे नमुने घेण्यात आले. त्यांच्यापासून मोठय़ा प्रमाणात जेनेटिकली इंजिनिअर पेशी बनविल्या आल्या आणि त्यांची ही कृत्रिम कॉफी आहे.