महासभेसमोर प्रस्ताव ः प्रशासनाचा कारभार चव्हाटÎावर ः सात कोटींच्या कामावरही शिक्कामोर्तब होणार
प्रतिनिधी/सांगली
कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिका प्रशासनाने आदिसागर मंगल कार्यालयात कोव्हिड केअर सेंटर सुरु केले होते. तब्बल साडे पाच महिने हे सेंटर सुरु होते. प्रती महिना एक लाख रुपये प्रमाणे साडेपाच लाख रुपये भाडे देण्याचा विषय महासभेसमोर ठेवण्यात आला आहे. वास्तविक आदिसागरमध्ये सेंटर सुरु करताना ते मोफत दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. आता मात्र भाडे देण्याचा विषय महासभेसमोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या सात कोटींच्या निधीमधील प्रस्तावित 67 कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याचा विषयही महासभेसमोर ठेवण्यात आला आहे. या कामांवरुन काही नगरसेवकांमध्ये `असंतोष’ निर्माण झाला होता. त्यामुळे या विषयावरुन महासभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. महापौर दिग्वीजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली येत्या बुधवार 12 मे रोजी महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन ऍप पद्धतीने ही सभा होणार आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये कोरोना संकटात महापालिका प्रशासनाने कोल्हापूर रस्त्यावर असणाऱया आदिसागर मंगल कार्यालयात कोरोना केअर सेंटर उभा केले होते.
त्यासाठी कोटÎावधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. दरम्यान कोरोना केअर सेंटरसाठी आ†िदसागर घेताना ते मोफत घेण्यात आल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले होते. तब्बल साडे पाच महिने आदिसागर मध्ये महापालिकेचे कोरोना केअर सेंटर सुरु होते. डिसेंबरमध्ये केअर सेंटर बंद करण्यात आले. त्यानंतर तब्बल चार महिन्यांनी आता आदिसागरला भाडे देण्याचा विषय महासभेसमोर ठेवण्यात आला आहे. प्रती महिना एक लाख रुपये प्रमाणे तब्बल साडे पाच लाख रुपयांचे भाडे आदिसागरला देण्यात येणार आहे. आदिसागर मोफत होते तर भाडे कशाचे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या विषयावरुन सभेत प्रशासनाच्या या कारभाराचे वाभाडे निघण्याची शक्यता आहे.
सात कोटींच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरणार
जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला सात कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून 67 कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांवरुन सदस्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. तब्बल 32 नगरसेवकांना एकही काम यामध्ये धरण्यात आले नव्हते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. नगरसेवकांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता. हा ठरावच रद्द करावा, अशी मागणी नाराज सदस्यांनी केली होती. मात्र यावर निर्णय झाला नव्हता. आता या कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याचा विषय महासभेसमोर ठेवण्यात आला आहे. या विषयावरुनही सभेत वादळी चर्चा होण्याचे संकेत आहेत.
रस्ते दुरुस्तींसाठी 6 कोटी
महापालिका क्षेत्रात कुपवाड व मिरज येथे एमआयडीसी आहे. तेथील अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. जिल्हा उद्योग मित्र समितीच्या आढावा बैठकित रस्ते दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी 5 कोटी 75 लाख 56 हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. जिल्हा नियोजन समितीमधून हा निधी मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱयांच्याकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.