ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेते आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.
आदेश चंद्रकांत बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शुक्रवार 24 जुलै 2020 पासून पुढील तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले. आदेश बांदेकर यांच्याकडे शिवसेनेचे नेतेपदही आहे.
श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईतील दादरमध्ये असलेल्या श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचा कारभार पुढील तीन वर्षे आता आदेश बांदेकर पाहणार आहेत.
दरम्यान, तीन वर्षांपूर्वी (जुलै 2017) आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. 2018 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला.