तीन वर्षांपासून बेपत्ता असणाऱया चौघांचा शोध जारी
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या तीन वर्षांपासून वडगाव परिसरातून बेपत्ता झालेल्या चौघा जणांचा शोध घेण्यात येत आहे. तीन वर्षांनंतरही त्यांचा थांगपत्ता लागला नसून पोलिसांनी मात्र प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.
वझे गल्ली-वडगाव येथील बसाप्पा अर्जुन बुचडी (वय 55) हे 26 मार्च 2018 पासून बेपत्ता आहेत. यासंबंधी 24 एप्रिल 2018 रोजी बसाप्पा यांची पत्नी महादेवीने शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. घरात कोणालाही न सांगता बसाप्पा घराबाहेर पडला आहे.
कलमेश्वर रोड-देवांगनगर पाचवा क्रॉस-वडगाव येथील शिवचंद्र शण्मुखप्पा संकपाळ (वय 55) हे 23 ऑक्टोबर 2018 च्या दुपारी 2 पासून बेपत्ता झाले आहेत. घरात कोणालाही न सांगता घराबाहेर पडलेल्या शिवचंद्र यांची पत्नी मंगल यांनी 25 नोव्हेंबर 2018 रोजी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
लक्ष्मीनगर-वडगाव येथील जोतिबा दत्तू मकाटे (वय 70) हा वृद्ध 9 मे 2018 च्या दुपारी 3 पासून बेपत्ता झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जिल्हा क्रीडांगणावर जाण्याचे सांगून ते घराबाहेर पडले होते. त्यांची पत्नी विमला यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
संभाजीनगर-वडगाव येथील विठ्ठल सुभाष हुलमनी (वय 31) हा युवक 2 जुलै 2018 च्या सकाळी 7 पासून बेपत्ता आहे. यासंबंधी त्याचे वडील सुभाष हुलमनी यांनी 28 नोव्हेंबर 2018 रोजी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. कामावर जाण्याचे सांगून घराबाहेर पडलेला विठ्ठल तीन वर्षांनंतरही घरी परतला नाही. या चौघा जणांविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405244 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.