मोफत वीज हमीचे राज्यात स्वागत
प्रतिनिधी /पणजी
राज्यात घरोघरी संपर्काच्या माध्यमातून आम आदमी पार्टी निम्म्यापेक्षा जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचली असून त्यातील 80 टक्के लोकांनी आपच्या मोफत वीज योजनेला पाठिंबा दिला आहे, त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांच्या या 24 तास अखंडित वीज हमीचे स्वागत केले आहे, अशी माहिती आपचे गोवा निमंत्रक राहूल म्हांबरे यांनी म्हटले आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोव्यात काहीच फुकट देणे शक्य नाही, असा दावा करणाऱया भाजप सरकारपुढे आपचे हे आश्वासन मोठे आव्हान ठरले आणि त्यातून त्यांना मोफत पाणी देण्याची घोषणा करावी लागली, यावरून आप हाच भाजपसमोर आव्हान उभे करू शकणारा पक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे, असेही म्हांबरे म्हणाले.
नुकतेच गोवा भेटीवर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोमंतकीयांना 300 युनिटपर्यंत मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचबरोबर 24 तास अखंडित वीज, सर्व थकित वीज बिले माफ करणे तसेच शेतकऱयांना मोफत वीज देण्याची घोषणाही त्यांनी केली होती.
ही सर्व आश्वासने आप पुढे घेऊन जात आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे 2 लाख घरांपर्यंत आपचे स्वयंसेवक पोहोचले आहेत. त्याद्वारे सुमारे 1.76 लाख म्हणजेच सरासरी 80 टक्के लोकांनी मोफत वीज घोषणेचे स्वागत केले आहे. यातील सर्वाधिक 86 टक्के घरे ही खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सांखळी मतदारसंघातील आहेत. त्याशिवाय वाळपईतील 78 टक्के आणि वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्या कुडचडे मतदारसंघातील 74 टक्के लोकांनी समर्थन दिले आहे, अशी माहिती म्हांबरे यांनी दिली.
खरे तर हा प्रकार विद्यमान वीजमंत्र्यांसाठी जबरदस्त ’शॉक’ आहे. यावरून विद्यमान सरकारबद्दल लोकांच्या मनात किती संताप आहे तेही स्पष्ट होते, अशी टीका म्हांबरे यांनी केली. या प्रकरणाची वस्तुस्थिती अशी आहे की, गोमंतकीय भाजपला कंटाळले आहेत, त्यामुळे त्यांनी मोठय़ा प्रमाणात आपला समर्थन दिले आहे, असेही म्हांबरे यांनी सांगितले.