सांगली/प्रतिनिधी
स्वर्गीय नेते आर आर आबा पाटील यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या तत्परतेमुळे दोन अपघातग्रस्तांचे प्राण वाचले आहेत. सांगली जिल्ह्यातील तासगाव मणेराजुरी रस्त्यावर वासुबे फाटा येथे मोटारसायकल आणि टेम्पो यांच्यात जोरदार धडक झाली होती. या अपघातात मोटारसायकलवरील कोल्हापूर जिल्ह्यातील गुडमुडशिंग गावचा अविनाश काटकर (वय २४ वर्ष) आणि सांगली जिल्ह्यातील वसगडे गावचा शुभम शिंदे (वय २४ वर्ष) हे दोघे गंभीर जखमी झाले होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील रस्त्याने जात होत्या. त्यांनी आपली गाडी थांबवत कोल्हापूर आणि सांगलीच्या दोघा जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत आमदार सुमनताई यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.
दरम्यान, अपघात झाला तेव्हा दोघंही तरुण जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. यावेळी माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील याच रस्त्याने जात होत्या. त्यांनी तो अपघात पाहिला आणि माणुसकी दाखवत तातडीने त्या थांबत दोन्ही जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून त्यांना तासगाव आणि नंतर सांगली शासकीय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. सुमनताईंच्या कार्यतत्परतेमुळेच केवळ त्या दोन्ही जखमींची प्राण वाचल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.