पक्षविरोधी वक्तव्ये केल्याप्रकरणी नोटीस
प्रतिनिधी / बेंगळूर
मुख्यमंत्री येडियुराप्पांसह अनेक भाजप नेत्यांवर परखडपणे टीका आणि पक्षाच्या वर्चस्वाला धक्का पोहोचविल्याचा आरोप विजापूरचे आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांच्यावर आहे. त्यामुळे भाजप हायकमांडने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
पक्षविरोधी वक्तव्ये करण्याची कारणे कोणती, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून समस्या असतील तर पक्ष पातळीवर सोडवता येतील. मात्र, सातत्याने पक्ष आणि पक्षातील नेत्यांना अडचणीत आणण्यासारखी विधाने केल्यास पक्षाच्या वर्चस्वाला धक्का पोहोचतो. ही पक्षविरोधी भूमिका असून यावर स्पष्टीकरण देण्याची सूचना भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांना दिली आहे.
राज्यात लवकरच मुख्यमंत्री बदलणार असून येडियुराप्पा पदावरून खाली येतील, असे विधान यत्नाळ यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर केले होते. तसेच येडियुराप्पा यांना धमकावून काही जणांनी मंत्रिपद मिळविले आहे, असा उघड आरोपही त्यांनी केला होता. याबाबत भाजपमधील काही नेत्यांनी यत्नाळ यांच्यावर टीका केली होती. शिवाय भाजप प्रदेशाध्यक्षांनी ताकीद देऊनसुद्धा यत्नाळ यांनी आपली भूमिका कायम ठेवली होती. त्यामुळे त्यांना पक्षाच्या शिस्तपालन समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.