अन्यथा बंड करू : कार्यकर्त्यांचा इशारा,महानंद अस्नोडकर, कार्तिक कुडणेकर इच्छुक
प्रतिनिधी /म्हापसा
भारतीय जनता पक्षावर आपला पूर्ण विश्वास आहे. आपले पक्ष वाढविण्यासाठी इतके कष्ट आहे. पक्ष मोठा करण्यासाठी आपण भरपूर काम केले आहे. मला दिलेली पदे सोडून मी पक्षाच्या हितासाठी दुसऱयांना दिली आहे. आमदार रोहन खंवटेकडेही आम्ही भांडण करणे म्हणजे आपले आणि त्यांचे वैयक्तिक शत्रुत्व काही नाही. पण पक्षासाठी सदैव आम्ही पक्षाच्या हितासाठी भांडण केले आहे, असे उत्तर गोवा भाजपा अध्यक्ष महानंद अस्नोडकर यांनी दै. ‘तरुण भारत’ला बोलताना स्पष्ट केले. पर्वरी मतदारसंघातून भाजप आगामी निवडणुकीसाठी आपल्यालाच उमेदवारी देणार, असा दावा त्यांनी यावेळी केला.
आगामी निवडणुकीत भाजपतर्फे पर्वरी मतदारसंघात आमदार रोहन खंवटे यांचे आगामी भाजपा उमेदवार म्हणून नाव घेतले जाते, अशी सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. याबाबत आपली प्रतिक्रिया काय? असा प्रश्न अस्नोडकर यांना केला असता ते म्हणाले, जोपर्यंत खंवटे राजीनामा देऊन पक्षात प्रवेश करीत नाही तसेच पक्ष त्यांना भाजपचा उमेदवार म्हणून घोषित करीत नाही तोपर्यंत आम्हीही काही बोलू शकत नाही. मला यावेळी एकच माहीत आहे आपण या पक्षासाठी गेली अनेक वर्षे तळागाळापासून काम करीत असून पक्ष मला उमेदवारी देणार आहे. पक्ष आपला विश्वासघात करणार नाही, असा विश्वास असल्याचे अस्नोडकर म्हणाले.
दोन कार्यकर्त्यांनी पर्वरीतून निवडणूक लढविण्याचा इच्छा प्रकट केली आहे. त्यात एक महानंद अस्नोडकर व दुसरा उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महानंद अस्नोडकरनी भाजप पक्षाची अविरत सेवा केली आहे. शिवाय पक्षाने सांगितलेली कामे ते प्रामाणिकपणे आजवर करीत आले आहे. त्यामुळे आज तिकिटासाठी आपण दावेदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सुकूर पंचायतीमध्ये अस्नोडकर हे तीनवेळा सरपंचही झालेले आहेत आणि आता भाजपा उत्तर गोवा अध्यक्षपदी आहेत.
दुसऱया बाजूने जिल्हा पंचायत उत्तर गोवा अध्यक्ष कार्तिक कुडणेकर यांचेही नाव उमेदवारीसाच्या शर्यतीत आहे. कुडणेकर यांचाही येथे जनसंपर्क आहे. त्यांची पत्नीही सुकूरच्या विद्यमान पंच आहेत. गेल्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत ते जिल्हा पंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. विद्यमान ते अध्यक्षपदाचा धुरा सांभाळत आहे.
खंवटेचा भाजप प्रवेश झाल्यास राजकीय समीकरणे बदलणार महिन्यापूर्वी रोहन खंवटे यांच्या समर्थकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला; मात्र शुक्रवारी अचानक काँग्रेसमधून ते राजीनामा देऊन बाहेर पडले त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांवर ठपका ठेवीत ते विश्वासात घेत नसल्याचा आरोप करून सर्वजण बाजूला सरले. रोहनचे समर्थक काँग्रेसमध्ये गेल्याने ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असे वाटत होते. मात्र आता आमदार रोहन खंवटे भाजपच्या वाटेवर असल्याने पर्वरी मतदारसंघाचे पूर्णतः राजकारणच बदलून गेले आहे. गेली 30 ते 35 वर्षे भाजप पक्षाशी निष्ठावंत असलेले कार्यकर्तेही दुखावले असल्याचे बोलले जात असून खंवटे यांनी भाजपात प्रवेश केल्यास कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे आगामी काळच सांगणार आहे.