लॉकडाऊन काळात संग्रहालयाला दिलासा, प्राणीप्रेमींतून समाधान
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊन काळात अडचणीत आलेल्या राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील ‘शौर्य’ नावाच्या वाघाला ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सोमवारी दत्तक घेतले. हेब्बाळकर यांनी आपल्या भावाच्या मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी संग्रहालयात दाखल झालेल्या दोन वाघांपैकी ‘शौर्य’ या नर जातीच्या वाघाला दत्तक घेऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
शहरापासून अवघ्या आठ-दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भुतरामहट्टी येथील प्राणीसंग्रहालयात आतापर्यंत तीन सिंह, दोन वाघ, तीन बिबटे व दोन कोल्हे दाखल झाले आहेत. त्यांच्या दैनंदिन खाण्यापिण्याबरोबर देखभालीचा खर्च मोठा आहे. लॉकडाऊनमुळे काही दिवसांपासून संग्रहालय पर्यटकांसाठी बंद झाल्याने महसूलही पूर्णपणे थांबला आहे. शिवाय शासनाकडून मिळणारे अनुदानही कमी झाल्याने वन्यप्राण्यांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, संग्रहालयामार्फत वन्यप्राण्यांना दत्तक घेण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जबाबदारी उचलली आहे.
लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील वाघाला दत्तक घेऊन भाचा हर्षित याचा वाढदिवस साजरा केला. या उपक्रमाबद्दल प्राणीप्रेमींतून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, उपवन संरक्षणाधिकारी एम. व्ही. अमरनाथ यांच्याकडे 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करून वाघाच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारली. याप्रसंगी चन्नराज हट्टीहोळी, भुतरामहट्टी आरएफओ राकेश अर्जुनवाड व वनखात्याचे अधिकारी उपस्थित होते.