गोव्यात होणाऱया या स्पर्धेत 115 सामने खेळविले जाणार
क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या हंगामाला आजपासून गोव्यात सुरुवात होत आहे. कोरोनाच्या जागतिक साथीमध्येही देशातील फुटबॉलचे यामुळे पुनरागमन होत आहे. आज शुक्रवारी बांबोळीच्या जीएमसी स्टेडियमवर केरळ ब्लास्टर्स आणि कोलकाताच्या एटीके मोहन बागान यांच्यात संध्याकाळी 7.30 वाजता शुभारंभी लढत होईल.
गेल्या मार्च महिन्यात सहाव्या हिरो आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना एटीके कोलकाता आणि चेन्नईन एफसी यांच्यात फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. तेव्हा कोरोनाचा संसर्ग भितीदायक पद्धतीने देशभर पसरत असल्याने हा अंतिम सामना फातोर्डा स्टेडियमवर प्रेक्षकांशिवाय पार पडला होता. सामान्य जीवन ठप्प होण्यापूर्वी झालेली ती एक अखेरची क्रीडा स्पर्धा ठरली होते.
आता आठ महिन्यांत देशात पुनरागमन करीत असलेली पहिली मोठी क्रीडा स्पर्धा आयएसएलच ठरली आहे. यंदाच्या सातव्या हंगामातसुद्धा सामने पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींची उपस्थिती स्टेडियम्सवर नसेल. जैव-सुरक्षित वातावरणात सर्व सहभागी संघ खेळतील. यंदाच्या आयएसएलमध्ये हीच एक बाब वेगळी नाहीय. यंदा स्पर्धेत ईस्ट बंगाल संघाची भर पडली असून ही आजवरची सर्वांत मोठी आयएसएल फुटबॉल स्पर्धा ठरेल. ईस्ट बंगालच्या पदार्पणासह सहभागी संघांची संख्या एकने वाढून ती आता 11 झाली आहे, तर एकूण सामने 95 वरून 115 पर्यंत वाढले आहेत.
ईस्ट बंगालचे पदार्पण होईल, तर एटीके मोहन बागान यांचे विलीनीकरण झाले आहे. त्याबरोबरच भारतीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक ऐतिहासिक वारसा असलेले हे दोन संघ आयएसएलमध्ये प्रथमच आमनेसामने येतील. ही बहुचर्चित कोलकाता डर्बी 27 नोव्हेंबर रोजी वास्कोच्या टिळक मैदानावर होणार आहे.
ईस्ट बंगालने भरती केलेला नार्विच सिटीचा स्टार फुटबॉलपटू अँथनी पिल्कीग्टनने सांगितले की, स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा कोलकाता डर्बी तसेच ही लढत केवढी प्रतिष्ठेची असते याबद्दल आम्हाला सांगण्यात आले. साहजिकच मोसमाचा प्रारंभ होण्यासाठी सर्व संघांतील विदेशी खेळाडू आतूर आहेत, असे तो म्हणाला.
आयएसएल फुटबॉलमुळे फुटबॉल चाहत्यांना टीव्हीवर अनेक नवे स्टार फुटबॉलपटू पहायला मिळतील. रिडींग संघाचा माजी स्ट्रायकर ऍडम ली फाँड्रे, न्यूकॅसल युनायटेडचा बचावपटू स्टीव्हन टेलर अशा खेळाडूंनी भारताचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे या स्पर्धेला चांगले महत्त्व मिळाले आहे.
गतमोसमात सर्वाधिक गोलांच्या क्रमवारीत संयुक्तपणे अव्वल स्थान मिळविलेला नेरीयूस वॅल्सकीस आता जमशेदपूर एफसीमध्ये दाखल झाला आहे. भारताचा अव्वल बचावपटू संदेश झिंगान याने मोहन बागानशी करार केला आहे. अशा अनेक अनुभवी आणि युवा फुटबॉलपटूंनी संघ बदल केले असून ते नवीन जर्सीत दिसतील.
फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियम, बांबोळीतील जीएमसी ऍथलेटीक स्टेडियम आणि वास्कोचे टिळक मैदानावर येथे या स्पर्धेतील सामने खेळविण्यात येतील. दर रविवारी दोन सामने खेळविण्यात येणार आहेत. चाहते स्पर्धेचा थरार घरी टीव्हीवर लुटणार असले तरी स्टेडियम्सवर त्यांची गैरहजेरी जाणवणार नाही. नाविन्यपूर्ण अशा फॅन वॉल संकल्पनेमुळे घरच्या मैदानावर गर्दी करणारे स्थानिक तसेच प्रतिस्पर्धी संघांचे समर्थक प्रोत्साहन देण्यास उपस्थित असतील. स्टेडियम्सवर दोन एलईडी स्क्रीन लावण्यात येतील, त्यामुळे दोन्ही संघांना प्रोत्साहनही मिळेल.