क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत आज बुधवारी मुंबई सिटीचा सामना ओडिशा एफसी संघाशी होणार आहे. बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात येईल. मुंबईचा संघ सध्या दुसऱया तर ओडिशा शेवटच्या स्थानावर आहे.
या लढतीत ओडिशाचा संदर्भ दुय्यम असेल, कारण त्यांचे आव्हान यापूर्वीच आटोपले आहे. लीगमधील अव्वल स्थानाच्या व्यापक संदर्भासाठी ही लढत महत्वाची आहे. सध्या आघाडीवर असलेल्या एटीके मोहन बागानला हैदराबाद एफसीविरूद्ध गुण गमवावे लागले आहेत. त्यामुळे सर्जिओ लॉबेरा यांच्या मुंबई सिटीला संधी आहे. विजय मिळवून ते पहिल्या स्थानाची शर्यत लीग टप्प्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नेणार का याची उत्सुकता असेल. लीगमधील पहिल्या स्थानासाठी असलेल्या शील्डसाठी या दोन संघांमध्ये चुरस आहे. ओडिशाला केवळ प्रतिष्ठतेसाठी खेळायचे असेल तरी मुंबई सिटीला गारद केल्यास ते या शर्यतीत महत्वाची भुमिका पार पाडू शकतात.
मुंबई सिटीच्या कामगिरीत शैथिल्य आले आहे, जे त्यांना झटकून टाकावे लागेल. बहुतांश लीगमध्ये त्यांची कामगिरी चांगली झाली, पण अंतिम टप्प्यात त्यात घसरण झाली आहे. लॉबेरा यांच्या संघाला गेल्या सहा सामन्यांत केवळ एक विजय मिळविता आला असून गेल्या तीन सामन्यांत त्यांना विजय मिळालेला नाही.
मागील लढतीत त्यांना जमशेदपूर एफसीविरुद्ध पराभूत व्हावे लागले. अशावेळी संघाच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही तर अव्वल स्थानाच्या आशा संपुष्टात येतील याची लॉबेरा यांना कल्पना आहे. आम्हाला कामगिरीत सुधारणा करावी लागेल, कारण आम्हाला सामना जिंकायचा आहे. मागील लढतीत कसा खेळ झाला तर जिंकणे अशक्य असेल. आमचे लक्ष आमच्या खेळावर असून दोन्ही आघाडय़ांवर आम्हाला सुधारणा करावी लागेल, असे लॉबेरा म्हणाले.
आम्ही प्रतिस्पर्ध्यांना अनंक संधी दिल्या आणि गोलही करू दिले. आम्हाला पुरेशा संधी मिळविता आल्या नाहीत. आम्हाला आमच्या खेळात सुधारणा करावी लागेल, असे लॉबेरा म्हणाले. आम्ही मोसमातील सर्वांत खराब सामना जमशेदपूरविरूद्ध खेळलो. आता तो सामना भुतकाळात जमा झाला असेल अशी आशा आहे. आमचा वर्तमान आणि भविष्यकाळ सर्वाधिक महत्वाचा आहे. मागील लढतीचा दिवस वाईट ठरला. असे काही वेळा घडते पण त्याची पुनरावृत्ती टाळणे महत्वाचे असते, असे लॉबेरा म्हणाले.
दरम्यान, ओडिशा संघाची सुत्रे भारताचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू स्टीव्हन डायस यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. हंगामी प्रशिक्षक जेराल्ड पेटन यांनी वैयक्तिक कारणांसाठी क्लबचा निरोप घेतला आहे. डायस यांनी तरूण खेळाडूंवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले. आमच्याकडे खरोखरच चांगले तरूण खेळाडू आहेत. संघ संतुलित असल्याचे अजुनही वाटते, पण आम्ही दुदैवी ठरलो. मोसमाच्या प्रारंभी थोईबा सिंग आणि सौरभ मेहेर यांना मध्यफळीत संधी मिळाली, पण एक-दोन सामने झाल्यानंतर प्रशिक्षक स्टुअर्ट बॅक्सटर यांना सुद्धा भारतीय खेळाडूंना जास्त संधी देणे शक्य झाले नाही.
भारतीय खेळाडू खूप प्रतिभाशाली असून मी त्यांना सराव करताना पाहिले आहे. भविष्यात ते उत्तम खेळाडू बनतील. काही तरूण खेळाडूंना संधी देण्यासाठी मी शक्य तेवढे प्रयत्न करीन. एका सामन्यामुळे तुमच्या कारकिर्दीला कलाटणी मिळू शकते. मी तरूण खेळाडूंना नेहमी सांगतो की, तुम्ही तयारी करून सज्ज राहा आणि तुम्हाला संधी मिळेल तेव्हा क्षमता सिद्ध करून दाखवा, असे स्टीव्हन डायस म्हणाले.