काबूल / वृत्तसंस्था
काबूल विमानतळावर सोमवारी सकाळी आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी रॉकेटद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वाहनांमध्ये बसविण्यात आलेल्या लाँचरमधून विमानतळ परिसरात पाचवेळा रॉकेटचा मारा करण्यात आला. मात्र अमेरिकेच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ही रॉकेट पाडल्यामुळे दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा डाव फसला. या रॉकेट हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अमेरिकेच्या फौजांनी सी-रॅम या रॉकेटविरोधी प्रणालीचा आणि मोर्टार सिस्टीमचा वापर करून ही रॉकेट हवेतच रोखली, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी सांगितले. अमेरिकेच्या सैन्याच्या माघारीची प्रक्रिया सुरू असतानाही काबूल विमानतळावरील ही हवाई संरक्षण प्रणाली कार्यरत राहणार आहे. या रॉकेट हल्ल्याबाबत सविस्तर तपशील जारी करण्यात आलेला नाही.