आठ दिवसात कारवाई न केल्यास न्यायालयात जाणार : गिरीश चोडणकर
प्रतिनिधी /पणजी
गोवा औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच जीआयडीसीचे भूखंड उद्योगमंत्री विश्वजित राणे आणि आयडीसी अध्यक्ष ग्लेन टिकलो यांनी बेकायदेशीरपणे जादा दराने विकून सुमारे रु. 100 कोटींचा घोटाळा केला आहे, अशी माहिती गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उघड केली आहे. या प्रकरणी सरकारने आठ दिवसात कोणतीच कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा चोडणकर यांनी दिला आहे. तसेच उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा गंभीर आरोप करुन सांगितले की, सुमारे 5 लाख चौ.मी. जमिनीचे 31 भूखंड करण्यात आले आणि ते नियोजित दरापेक्षा रु. 2000 ते 4000 अशा वाढीव दराने विकण्यात आले. ते भूखंड विकसित करताना आणि विकताना नगरनियोजन, आयडीसी, रेरा यांचे नियम डावलण्यात आले. त्यात राणे आणि टिकलो या दोघांचा हात आहे असा दावा त्यांनी करुन त्यांचे पुरावे देखील असल्याचे नमूद केले. हा एक मोठा घोटाळा असून केंद्र सरकारचा ‘रेरा’ कायदाही पाळण्यात आला नाही, असा दावा चोडणकर यांनी केला आहे.
रेरा कायद्याचे केले उल्लंघन
भूखंडाची विक्री व विकसित करताना ‘रेरा’ कायद्याचे पालन करावे लागते. सरकारला देखील त्याचे पालन करणे बंधनकारक आहे, परंतु आयडीसीच्या या भूखंड विक्री घोटाळ्य़ात सर्व नियम, परवाने गुंडाळण्यात आले. हे सर्व बेकायदेशीरपणे करण्यात आले. त्यामुळे यात कोटय़वधींचा घोटाळा झालेला आहे. या वाढीव दरामुळे कोणी उद्योजक गोव्यात येत नाही आणि उद्योग सुरु करण्यास उत्सुक नाही, असेही चोडणकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी आणि आठ दिवसात काय ते सांगावे नाहीतर हा विषय उच्च न्यायालयात नेणार असल्याचे चोडणकर यांनी जाहीर केले.