26 सप्टेंबर-8 नोव्हेंबर या कालावधीत होणार आयोजन, प्रक्षेपक, प्रँचायजी मात्र नाराज
वृत्तसंस्था/ मुंबई
बीसीसीआयने आयपीएलच्या या मोसमातील सामन्यांचे तात्पुरते वेळापत्रक तयार केले असून ही स्पर्धा त्यांना 26 सप्टेंबरपासून सुरू व्हावी आणि 8 नोव्हेंबरला त्याचा समारोप व्हावा, अशी इच्छा आहे. 44 दिवसांत 60 सामने आयोजित करण्याचे वेळापत्रक त्यांनी तयार केले आहे. मात्र दिवाळीत सामने नसल्याने स्पर्धेचे ब्रॉडकास्टर स्टार इंडिया या वेळापत्रकावर खुश नसल्याचे समजते.
स्टार इंडिया हे या स्पर्धेचे प्रक्षेपणकर्ते असून त्यांनी व प्रँचायजींनी भरगच्च वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. माहितगार सूत्रांनुसार, कोरोना महामारीमुळे सर्वांनाचा आर्थिक झळ बसली आहे. त्याची थोडीफार तरी भरपाई व्हावी, असे त्यांना वाटते. यासाठी त्यांना स्पर्धा कालावधीत येणाऱया दिवाळीचा लाभ उठवायचा आहे. दिवाळीच्या सुमारास त्यांना जादा जाहिराती मिळण्याची अपेक्षा आहे. यावेळची दिवाळी 14 नोव्हेंबरला (शनिवार) असल्याने त्या दोन दिवसात आयपीएलचा समारोप व्हावा, असे स्टार इंडियाला वाटते. पण बीसीसीआयने जे वेळापत्रक तयार केले आहे, त्यानुसार दुपारच्या वेळी जास्त सामन्यांचे आयोजन होणार आहे. अशा सामन्यांना चाहत्यांचा कमी प्रतिसाद मिळेल आणि रेटिंगही कमी होईल, असे या वेळापत्रकाला विरोध करणाऱयांना वाटते. या वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार असून क्वारंटाईनसाठी संघाला लवकर प्रयाण करावे लागणार आहे. त्याची सोय पाहून हे वेळापत्रक तयार केले असल्याचेही त्यांना वाटते.
दिवाळीच्या कालावधीत आयपीएलला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळतो, असे आढळून आले असल्याने त्या कालावधीत सामने न ठेवता खेळाडूंना दिवाळी ब्रेक देण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआयने दिले आहे. 8 नोव्हेंबरला आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ 10 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाकडे रवाना होईल. तेथे त्यांची कोव्हिड चाचणी होईल आणि सरावाला सुरुवात करून सराव सामनाही खेळतील. तसे झाल्यास पहिली कसोटी ठरलेल्या दिवशी 3 डिसेंबरला सुरू होऊ शकेल. याशिवाय डे-नाईट कसोटीआधी एक डे-नाईट सराव सामनाही भारतीय संघ खेळण्याची शक्यता आहे, असे मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.
आयपीएलचे वेळापत्रक तयार झाले असले तरी गव्हर्निंग कौन्सिलने त्याला अद्याप मंजुरी दिलेली नाही. आयसीसीने टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकल्याची घोषणा केल्यामुळे आता या वेळापत्रकाला मंजुरी देऊन ते लवकरच जाहीर करण्यात येईल. स्टार इंडियाने 2018 मध्ये पाच वर्षांसाठी प्रक्षेपण हक्क 16,347 कोटी रुपयांना मिळविले असून ते बीसीसीआयला प्रतिवर्षी 3500 ते 4000 कोटी रुपये देणार आहेत.