मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपरकिंग्स पहिली लढत, पाच महिन्यानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळ गजबजणार
वृत्तसंस्था/ अबु धाबी
कोरोनामुळे मागील पाच महिन्यापासून खेळापासून वंचित राहिलेल्या क्रीडा रसिकांना आता आयपीएलच्या रूपात भारतीय क्रिकेट मोसम सुरू झाल्याचे शनिवारपासून पहावयास मिळणार आहे. मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स यांच्या ‘ब्लॉकबस्टर’ लढतीतील रोमांच त्यांना सुरुवातीलाच बघता येणार आहे.
बंदिस्त स्टेडियममधील पहिली स्पर्धा
वास्तविक, आयपीएल स्पर्धा विदेशी भूमीत खेळवली जाण्याची ही पहिली वेळ अजिबात नाही. पण, या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय क्रीडा क्षेत्र नव्याने गजबजले जाणार असल्याने यंदाच्या स्पर्धेला विशेष महत्त्व असेल. यंदाची स्पर्धा बंदिस्त स्टेडियममध्ये आणि जैवसुरक्षित वातावरणात खेळवली जाणार आहे.
मुंबई इंडियन्सची धुरा रोहित शर्मा, हार्दिक व कृणाल हे पंडय़ा बंधू, केरॉन पोलार्ड व ‘किंग ऑफ डेथ’ म्हणून ओळखल्या जाणाऱया जसप्रित बुमराहवर असेल. चेन्नईला वयस्कर खेळाडूंचा संघ म्हणून हिणवले गेले असले तरी धोनीचा करिष्मा सुरु होईल, त्यावेळी भल्याभल्यांची दैना उडणार आहे. शेन वॅटसन, डेव्हॉन ब्रेव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस व रविंद्र जडेजा या संघात जान भरतील.
विराटसमोर ‘विराट’ आव्हान
भारतीय कर्णधार विराट कोहलीला यंदा ही स्पर्धा जिंकत आपला जागतिक स्तरावरील लौकिक सिद्ध करण्याचे आव्हान नव्याने पेलावे लागेल. ऍरॉन फिंच, ख्रिस मॉरिस व नव्याने लाभलेला गुणवान खेळाडू देवदत्त पडिक्कलकडून आरसीबीच्या अपेक्षा आहेत.
मागील काही हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा चेहरामोहरा झपाटय़ाने बदलला असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पृथ्वी शॉ, ऋषभ पंतचे कसब पणाला लागेल. रविचंद्रन अश्विनचा अनुभव या संघासाठी उपयुक्त ठरु शकतो.
यापूर्वी, 2014 साली आयपीएल स्पर्धा काही अंशी संयुक्त अरब अमिरातीत भरवली गेली, त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स विजेते ठरले होते.
या निमित्ताने तो इतिहास केकेआरच्या आठवणींना उजाळा देणारा ठरेल.
किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल बहरात आहे आणि त्याने नेतृत्वगुण सिद्ध करण्याची मालिका कायम राखली तर येत्या काही वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाचा नवा कर्णधार कोण असेल, हे सांगण्याची वेगळी गरज भासणार नाही. अर्थात, ग्लेन मॅक्सवेल, गेल, मोहम्मद शमी यांच्यासारख्या खेळाडूंना तो कसा हाताळेल, हे देखील महत्त्वाचे ठरेल. या संघातील खेळाडूत सातत्याचा अभाव आहे. ती कसर भरुन काढून घेणे, हा केएल राहुलचा प्राधान्यक्रम असेल.
हैदराबादची धुरा वॉर्नरकडे
कमी प्रकाशझोतात राहत आलेला सनरायजर्स हैदराबादचा संघ मजल-दरमजल प्रवास करत जेतेपदाच्या लढतीपर्यंत पोहोचण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. जॉनी बेअरस्टोचा करिष्मा, केन विल्यम्सनचा संयम आणि रशीद खानची भेदक गोलंदाजीची क्षमता त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरु शकेल. विराट सिंग व प्रियम गर्ग हे संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत असतील.
यापूर्वी, 2014 साली आयपीएल स्पर्धा काही अंशी संयुक्त अरब अमिरातीत भरवली गेली, त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स विजेते ठरले होते. या निमित्ताने तो इतिहास केकेआरच्या आठवणींना उजाळा देणारा ठरेल.
चौकार-षटकारांसाठी होणार कृत्रिम गोंगाट!
यंदा आयपीएल स्पर्धेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांचा जल्लोष, गोंगाट, आवाज स्टेडियमवर नसेल. पण, ही कसर भरुन काढण्यासाठी डेव्हिड वॉर्नर किंवा ख्रिस गेलसारखे फलंदाज चौकार, षटकार खेचतील, त्यावेळी प्रेक्षकांचे संग्रहित कृत्रिम गोंगाट प्रसारित केले जाणार आहेत.
सुपरओव्हर्सदरम्यान प्रेक्षकांचा गलका यंदा दिसून येणार नाही. पण, ही कसर देखील संग्रहित गोंगाटाच्या आवाजावरच भरुन काढली जाणार आहे.
आजचा सामना
मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपरकिंग्स
ठिकाण : अबु धाबी
भारतीय प्रमाणवेळ : सा. 7.30 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.