वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
कॅरेबियन प्रीमियर लीग ही स्पर्धा पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे सप्टेंबरमध्येच होईल. त्यामुळे, बीसीसीआयने आयपीएलसाठी हा कालावधी वगळून स्वतंत्र विंडो शोधावा, अशी सूचना कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेचे सीईओ पेटे रसेल यांनी केली. कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल स्पर्धा लांबणीवर टाकली गेली असून ती सप्टेंबर-ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. ही स्पर्धा बीसीसीआयने सप्टेंबर-ऑक्टोबमध्ये घेतली तर त्याच्या तारखा आयपीएलप्रमाणे असू शकतात व याचा सीपीएलला फटका बसू शकतो. त्या पार्श्वभूमीवर कॅरेबियन लीगने ही सूचना केली.
एकंदरीतच बहुतांशी क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक सपशेल कोलमडले असून आशिया चषक आणि टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या वेळापत्रकात फेरबदल करावा लागेल, असे संकेत आहेत. विंडीजमध्ये कॅरेबियन प्रिमियर लीग टी-20 स्पर्धा 19 ऑगस्ट ते 26 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. आयपीएल स्पर्धा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये घेतली गेली तर दोन्ही स्पर्धांच्या तारखामध्ये फरक राहणार नाही. अशा स्थितीत क्रिकेटपटूंसमोर पेच निर्माण होऊ शकतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रामध्ये भारतीय क्रिकेट मंडळ ही संस्था सर्व बाजूने भक्कम असल्याने त्यांनी आयपीएल स्पर्धेसाठी आपला स्वत:चा वेगळा विंडो शोधावा, असे रस्सेल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत कोव्हिड-19 महामारीमध्ये कॅरेबियन प्रिमियर लीग स्पर्धेचे यजमानपद भुषविणाऱया सहा देशांमध्ये कोरोनाग्रस्त बळींची संख्या नगण्य असल्याचे रस्सेल यांनी म्हटले आहे.