वृत्तसंस्था/ चेन्नई
2021 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी येथे 18 फेब्रुवारी रोजी क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. या लिलावासाठी माजी कसोटीवीर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तसेच माजी वेगवान गोलंदाज श्रीशांत यांनी नोंदणी केली.
आयपीएल स्पर्धेसाठी होणाऱया क्रिकेटपटूंच्या लिलावासाठी आतापर्यंत 1097 क्रिकेटपटूंनी आपली नांवे अधिकृतपणे स्पर्धा आयोजकांकडे नोंद केली आहेत. बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसन तसेच भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत यांनी आपली नांवे नोंदविली आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याचे नांव आयपीएल क्रिकेटपटूंच्या लिलाव प्रक्रियेत नोंद झाले असून अर्जुनवर 20 लाखापासून बोली केली जाणार आहे.
आयपीएल स्पर्धेसाठी एकूण 814 क्रिकेटपटूंनी आपली नांवे नोंदविली असून त्यामध्ये 283 विदेशी क्रिकेपटूंचा समावेश आहे. विंडीजचे 56, ऑस्ट्रेलियाचे 42 आणि दक्षिण आफ्रिकेचे 38 क्रिकेटपटू या लिलावात भाग घेत आहेत. 37 वर्षीय एस. श्रीशांतवर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात 2013 साली अजीवन बंदी घालण्यात आली होती पण त्यानंतर त्याच्या बंदीचा कालावधी कमी करण्यात आला होता. त्याच्यावर सात वर्षांची बंदी लादण्यात आली होती. या बंदीचा कालावधी संपुष्टात आल्याने श्रीशांतने आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी आपली तयारी दर्शविली आहे.