वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्सने सर्वोत्तम आयपीएल संघाची निवड केली असून चेन्नई सुपरकिंग्सच्या एमएस धोनीला या संघाचा कर्णधार म्हणून त्याने निवडले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन व ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ यांना चौथ्या क्रमांकाचे पर्याय म्हणून ठेवले होते. पण संघ निवडीच्या निकषानुसार शेवटी या क्रमांकासाठी त्याने स्वतःचीच निवड केली आहे.
चार विदेशी खेळाडूंच्या निवडीची अट असल्याने मी स्वतःची निवड केली असल्याचे क्रिकबझसाठी समालोचक हर्षा भोगलेसमवेत चर्चा करताना त्याने स्पष्ट केले. ‘चौथ्या क्रमांकासाठी विल्यम्सन, स्मिथ व मी यापैकी एकाची निवड करायची होती. पण मी तुम्हाला अन्य दोन पर्यायही दिले आहेत,’ असे त्याने सांगितले. सलामीवीर म्हणून त्याने सेहवाग व रोहित शर्मा यांना निवडले आहे. गेल्या पाच वर्षांत रोहितने सर्वोत्तम क्रिकेटचे प्रदर्शन केले आहे, असे तो रोहितबद्दल म्हणाला. कोहलीला तिसऱया, इंग्लंडच्या बेन स्टोक्सला पाचव्या व धोनीला सहाव्या स्थानासाठी त्याने निवडले आहे. डीव्हिलियर्सने निवडलेला सर्वोत्तम आयपीएल संघ (फलंदाजीच्या क्रमानुसार) : सेहवाग, रोहित शर्मा, कोहली, विल्यम्सन-स्मिथ-डीव्हिलियर्स, स्टोक्स, धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, रशिद खान, भुवनेश्वर कुमार, रबाडा, बुमराह.