वृत्तसंस्था/ अबु धाबी
यजमान संयुक्त अरब अमिरात आणि आयर्लंड यांच्यातील रविवारी खेळविण्यात येणारा वनडे क्रिकेट सामना लांबणीवर टाकण्यात आला आहे. अमिरात संघातील एका खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्याचे शनिवारी आढळून आले. त्यामुळे या दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी हा सामना लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. आता हा सामना 16 जानेवारीला खेळविला जाईल.
शनिवारी संयुक्त अरब अमिरात संघातील फलंदाज अलिशान शेराफू याची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि यात तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. गेल्या काही दिवसामध्ये अमिरात संघातील तीन क्रिकेटपटूंना कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी अमिरात संघातील फलंदाज चिराग सुरी आणि डावखुरा फिरकी गोलंदाज आर्यन लाक्रा यांना कोरोनाची बाधा झाली होती. अलिशान शेराफूला आता काही दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. उभय संघामध्ये चार सामन्यांची ही वनडे मालिका खेळविली जात आहे. या मालिकेत यजमान संयुक्त अरब अमिरातने पहिला सामना 6 गडय़ांनी जिंकून आयर्लंडवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील पुढील सामना 12 जानेवारी तर त्यानंतरचा सामना 14 जानेवारीला खेळविण्यात येणार आहे.