मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी / पणजी
सरकारने आयव्हर्मेक्टिन गोळ्या खरेदीच केल्या नसल्यामुळे घोटाळा होण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे.
आयव्हर्मेक्टिनच्या खरेदीत कोटय़वधींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधक करत असले तरीही तो पूर्णपणे निराधार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड उपचार पद्धतीतून आयव्हर्मेक्टिन वगळल्यानंतर गोवा सरकारनेही सदर औषध खरेदीचा प्रस्ताव फेटाळला आहे. यापूर्वी ही औषधे आयसीएमआरने मंजूर केली होती. त्यानंतर सरकारने होम आयसोलेशन किट मध्ये आयव्हर्मेक्टिन गोळ्या उपलब्ध करून दिल्या होत्या, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सरकारने 22 कोटी रुपयांच्या आयव्हर्मेक्टिन गोळ्या खरेदी केल्याचा विरोधकांचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला. प्रोफिलेक्सि उपचारांसाठी सरकारने हे औषध कधीच खरेदी केलेले नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कोणतेही मतभेद नाहीत : सावंत
दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि आपल्यात कोणतेही मतभेद नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. एखादवेळी वैयक्तिक मतभेद असू शकतात, परंतु राज्याच्या हिताचा विषय असतो तेव्हा आम्ही सर्वजण एकसंघ असतो. अशावेळी आमच्यात मतभेद असल्याचे वृत्त निराधार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.