बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप सीबीआयने केली कारवाई
प्रतिनिधी / पणजी
ओल्ड गोवा येथील भारतीय शेतकी संशोधन केंद्र (आयसीएआर) येथे मुख्य सहाय्यक तांत्रिक अधिकारी म्हणून काम करणाऱया मदिना सोलापुरी यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा नोद केला आहे. लाखो रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा ठपका मदिना यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांच्या विरोधात 13 (2) 13 (1) (बी) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
सीबाआयकडे मदिना सोलापुरी यांच्या विरोधात तक्रार आली असता सीबीआयने त्यांच्या मालमत्तेची 1 जानेवारी 2005 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीतील जमाखर्चाची हिशोब तपाणी केली असता त्यांच्याकडे 73 लाख 17 हजार 856 रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे.
संशयित मदिना सोलापुरी यांना मिळणारे वेतन व आणि त्यांच्याकडे असलेली मालमत्ता याच्यात मोठी तफावत आढळून आली असल्याने त्यांनी जमा केलेली बेहिशोबी मालमत्ता ही गैर व्यवहारातून जमा केली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ज्या काळातील हिशोब तपासणी करण्यात आली त्याच्या अगोदर मदिना सोलापूरी यांची मालमत्ता शून्य होती. सद्य स्थितीत त्यांच्याकडे 1 कोटी 22 लाख 46 हजार 413 रुपयांची मालमत्ता आहे. याच काळात त्यांनी 1 कोटी 21 लाख 56 हजार 897 इतका खर्च केलेला आहे. तसेच त्यांच्या बँक खात्यात 49 लाख 46 हजार 557 रुपये जमा आहेत. याच काळात त्यांचे एकूण उत्पन्न 1 कोटी 71 लाख 03 हजार 454 इतके आहे. त्यामुळे सुमारे 73 लाख 17 हजार 856 रुपयांची तफावत आढळून येत आहे.