प्रतिनिधी / बेळगाव
साऊथ केंकण एज्युकेशन सोसायटी संचलित राणी पार्वतीदेवी कला व वाणिज्य महाविद्यालयात बीबीए विभागातर्फे 2021 शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत व परिचय समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावातील प्रसिद्ध उद्योजक अरविंद कपाडीया, अध्यक्षस्थानी महाविद्यालय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा बिंबा नाडकर्णी व प्राचार्या डॉ. अचला देसाई, बीबीए विभागाचे समन्वयक प्रा. सविनय शिमनगौडर व शारीरिक शिक्षण प्रशिक्षक एन. रामकृष्ण उपस्थित होते.
श्रेया शिंपी व समुहाच्या स्वागतगीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. मान्यवरांतर्फे रोपटय़ाला पाणी घालून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अरविंद कपाडीया यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक, औद्योगिक, सामाजिक क्षेत्रात कोणत्याही भाषेचे महत्त्व व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व किती महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले.
औद्योगिक क्षेत्रातील त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांना मुक्तपणे समजावून दिले. त्याचबरोबर आपले आरोग्य व शारीरिक क्षमता कशी राखावी, हे सांगितले. बिंबा नाडकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी शिस्त, नियमितपणा तसेच प्रामाणिकपणा कसा अंगीकृत करावा, याबद्दल मार्गदर्शन केले. प्राचार्या डॉ. अचला देसाई यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापन क्रियांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक व विविध मनोरंजनपर स्पर्धांनी झाली. गोपाळ पुजारी व तेजस्विनी कामकर यांना मी. प्रेशर व मिस पेश म्हणून गौरविण्यात आले. अश्विनी हिने अतिथींचा परिचय, ज्योती हिने आभार व संपत गौडा याने सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता
झाली.