दरकपातीची शक्यता धुसर : मात्र, अर्थव्यवस्थेला चालना देणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ समितीची बैठक अंतिम टप्प्यात आली असून गुरुवारी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास सुधारित पतधोरण जाहीर करणार आहेत. या पतधोरणामध्ये दरांमध्ये कपात होण्याची शक्यता फारच कमी असल्यास संकेत आर्थिक क्षेत्रातील सूत्रांनी दिले आहेत. गेल्या काही महिन्यात कोरोनाच्या भयावह स्थितीनंतर अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आरबीआयकडून दरकपात करण्यात आली असली तरी हय़ावेळी समितीतील बऱयाच सदस्यांनी दरकपातीला विरोध दर्शवल्याचे समजते. मात्र, कोरोना महामारीनंतरच्या ढासळलेल्या स्थितीला चालना देण्यासाठी आरबीआयकडून विविध योजनांना बळकटी देण्यासाठी प्रोत्साहनात्मक उपाय जाहीर केले जाऊ शकतात.
कोरोना महामारीने देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होताना दिसत आहे. अनेक उद्योगांनाही याची झळ बसली आहे. लॉकडाऊनचा परिणाम कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक हरतऱहेचे प्रयत्न करत आहे. गेल्या काही सत्रांमध्ये एकंदर 1.15 टक्के इतकी कपात करण्यात आली होती. मात्र आता दरकपातीला फाटा देत महागाई दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी बँक आवश्यक ती पावले उचलू शकते. तसेच अर्थव्यवस्था वाढीस चालना देण्यासाठी इतर उपाययोजना जाहीर केल्या जाऊ शकतात.