आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती, जिह्यासाठी 144 नवे डॉक्टर, चिकोडीत प्रयोग शाळेला मंजुरी
प्रतिनिधी / बेळगाव
लोकसंख्येच्या आधारावर बेळगावला अतिरिक्त लस पुरविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबरोबरच कोरोना महामारी थोपविण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याबरोबरच ऑक्सीजनचा तुटवडा भासू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. भविष्यात आरोग्य व शिक्षण क्षेत्र बळकट करण्यासाठी अतिरिक्त अनुदान देण्यात येईल, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांगितले.
शुक्रवारी कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी केलेल्या उपाय योजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. सुवर्ण विधानसौधमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी व अधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. लोकसंख्येच्या आधारावर बेळगावला जादा लस पुरविण्यात येणार आहे. यासंबंधी आरोग्य मंत्र्यांनी चर्चा करुन सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोना परिस्थितीची हाताळणी असो किंवा इतर स्थानिक समस्या असोत. पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी चर्चा करावी. स्थानिक समस्यांवर येथेच तोडगा काढण्यात यावा. कोणत्याही समस्या असो किंवा सूचना सल्ला असो पालकमंत्र्यांशी चर्चा करावी. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.