ब्रिटनमधील कोरोना लसीकरणाच्या मंजुरीमुळे बाजार सुधारला
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी भारतीय भांडवली बाजारात तेजीचे संकेत राहिल्याचे पहावयास मिळाले आहेत. यामध्ये बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी नवीन विक्रम नोंदवत बंद झाले आहेत. आर्थिक, वाहन आणि आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या मजबूत समभागांच्या तेजीच्या जोरावर बाजाराने उच्चांकी पातळी गाठल्याचे पहावयास मिळाले आहे.
नव वर्षांच्या आगमनाने शेअर बाजारात चढ-उताराचे वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदार काहीसे चिंतेत राहिले होते. दिवसअखेर सेन्सेक्स 133.14 अंकांनी वधारुन निर्देशांक 47,746.22 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 49.35 अंकांच्या मजबुतीसह 13,981.95 वर स्थिरावला आहे.
दिवसभरातील कामगिरीदरम्यान सेन्सेक्स काही वेळ 47,807.85 चा उच्चांक तर निफ्टीने 13,997 चा टप्पा प्राप्त केल्याचे पहावयास मिळाले आहे. सेन्सेक्समध्ये अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग 4 टक्क्यांनी मजबूत राहिले असून सोबत बजाज फायनान्सचे समभाग 2.63 टक्क्यांनी तर मारुतीचे समभाग 2 टक्क्यांनी वधारले आहेत. सोबत महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, टेक महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, कोटक बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एशियन पेन्ट्स वधारत बंद झाले आहेत.
कोरोना लसीचा प्रभाव
ऍस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेल्या कोविड19 च्या लसीला ब्रिटनने मंजुरी दिली आहे. यामुळे युरोपीयन बाजारात प्रारंभीच्या काळात तेजी राहिली होती. ब्रिटनसोबत कोविड19 च्या दुसऱया लसीचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे भारतीय शेअर बाजाराने नवीन विक्रम प्राप्त करत आपली तेजी कायम ठेवल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात आशियातील शेअर बाजारात मिळताजुळता कल राहिला आहे. जपानचा टोकीयो आणि ऑस्ट्रेलियाचा सिडनी बाजार मात्र घसरणीसह बंद झाला.