पाचगाव / दयानंद जाधव
आर.के.नगर-पाचगाव मुख्य रस्ता चांगला असताना पुन्हा या रस्त्यावर 60 लाख रुपये खर्च करून पुन्हा डांबरीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था असताना ते रस्ते दुरुस्त करण्याऐवजी चांगल्या रस्त्यावर सुरू असलेल्या डांबरी करणामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आर.के.नगर पाचगाव मुख्य रस्ता काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आला आहे. या रस्त्यावर आर.के.नगरपासून संचयनी कॉलनीपर्यंत एक ते दोनच लहान खड्डे आहेत. पोस्टल कॉलनीजवळ रस्त्याला एक चर मारलेली आहे. एवढे सोडल्यास आर.के.नगरपासून संचयनी कॉलनीपर्यंत पूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा असताना या 1 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी सुमारे 60 लाख रुपये खर्च करून रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. वास्तविक दोन ते तीन ठिकाणी खड्ड्यांचे पॅच वर्क केले असते तरीही शासनाचे लाखो रुपये वाचले असते. दुसरीकडे अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. मोठे मोठे खड्डे पडले आहेत अशा रस्त्यांचे डांबरीकरण न करता चांगल्या रस्त्यावरच सुरू असलेल्या डांबरीकरणामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या सर्व डांबरीकरणाची चौकशी व्हावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.