चेन्नई / वृत्तसंस्था
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने एअरथिंग्ज मास्टर्स रॅपिड ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेतील शेवटच्या 15 व्या फेरीत रशियाच्या ब्लादिस्लाव्ह अर्तेमिएव्हला पराभवाचा धक्का दिला. पण, यानंतरही तो उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरु शकला नाही.
16 वर्षीय आर. प्रज्ञानंदने दिवसाच्या प्रारंभी 13 व्या फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरविरुद्ध बरोबरी प्राप्त केली. मात्र, 14 व्या फेरीत अमेरिकेच्या हान्स मोक्को निएमनविरुद्ध त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेच्या आठव्या फेरीत कार्लसनसारख्या दिग्गजाला पराभवाचा धक्का दिल्यानंतर आर. प्रज्ञानंद विशेष प्रकाशझोतात आला. पण, त्यानंतर उर्वरित टप्प्यात त्याची कामगिरी बरीच चढउताराची राहिली.
प्राथमिक टप्प्याअखेर 16 ग्रँडमास्टर्सच्या गुणतालिकेत आर. प्रज्ञानंद 19 गुणांसह 11 व्या स्थानी राहिला. पहिले 8 ग्रँडमास्टर्स बाद फेरीत पोहोचले. भारतीय ग्रँडमास्टरने केमरला 32 चालीत नमवत या स्पर्धेची सांगता केली. त्याने 15 फेऱयांमध्ये 5 विजय, 4 बरोबरी व 6 पराभव अशी कामगिरी नोंदवली. त्याने कार्लसनसह लेव्हॉन ऍरोनियन, रशियन आंद्रेय इसिपेंको, माजी महिला वर्ल्ड चॅम्पियन अलेक्झांड्रा कोस्टेन्यूएक व केमर यांच्याविरुद्ध विजय मिळवले.
प्राथमिक टप्प्यानंतर रशियाच्या इयान नेपोम्नियाचीने 29 गुणांसह अव्वलस्थान काबीज केले तर काही पराभव पचवावे लागलेला कार्लसन 25 गुणांसह दुसऱया स्थानी राहिला. अर्तेमिएव्ह 24 गुणांसह तिसऱया स्थानी पोहोचला. याशिवाय, इसिपेंको, इरिक हॅन्सेन (कॅनडा), डिंग लिरेन, लिएम कुआंग ले (दोघेही चीन) व केमर यांनी अव्वल आठमध्ये स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. या स्पर्धेतील प्राथमिक टप्प्यात विजयासाठी 3 तर बरोबरीसाठी 1 गुण प्रदान केले गेले.