ऑनलाईन टीम / पंढरपूर :
पंढरपूरात होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी म्हणजेच 17 ते 25 जुलै या काळात कलम 144 च्या अंतर्गत संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.
ते म्हणाले, 20 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यापूर्वी पासून म्हणजेच 17 जुलै ते 25 जुलै या काळात चंद्रभागा परिसरात कलम 144 लागू करण्यात येईल त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातही या काळात त्रिस्तरीय नाकाबंदी लावण्यात येणार आहे. त्यामुळे परवानगी नसलेल्या एकाही भाविकाला या काळात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे यंदाही बहुतेक भाविकांना आषाढी एकादशीला विठ्ठलाचं थेट दर्शन घेता येणार नाही.
यावर्षीही कोरोनामुळे पंढरपूरची पायी वारी होणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. त्याऐवजी मानाच्या पालख्यांना बसने वाखरीपर्यंत पादुका नेण्याचे नियोजन सरकारने केले आहे. वाखरीवरून प्रतिकात्मक स्वरूपात पालख्या पायी पंढरपूरला जाणार आहेत. केवळ वाखरी ते पंढरपूर दीड किलोमीटर दिंडी पायी येणार असून एकादशी दिवशी शहरातील 195 महाराज मंडळींना देवाचे मुखदर्शन मिळणार आहे. यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात शासन आदेश निघाला असून पायी वारीला मंजुरी न देण्यावर शासन ठाम आहे.